
सिन्नर : ( प्रतिनिधी ) जिल्हा परिषद शाळा पिंपळे, केंद्र ठाणगाव येथे पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. प्राथमिक शिक्षक महेश सोनवणे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली.
यावेळी महेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना दीपावलीचे महत्त्व सांगत फटाक्यांमुळे होणारे वायू व ध्वनी प्रदूषण तसेच त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनीही पर्यावरणपूरक दीपावली साजरी करण्याचा संकल्प केला.
दीपावलीनिमित्त शाळेत पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त आकाशकंदील तसेच ग्रीटिंग कार्ड तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध आकर्षक वस्तू तयार केल्या. तसेच विद्यार्थ्यांना दीपावली अभ्यास पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
मुख्याध्यापक भानुदास बेनके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपक्रमासाठी शिक्षक विजय एखंडे, मनीषा देसले, नीलम वाळुंज, गुंड आदींनी सहकार्य केले.

