
मनमाड : पत्रकार परिषदेत बोलताना सुरेखा पवार, अनिल निरभवणे, नरेन संसारे, ऍड मनीष रनशूर
एकाच नावाच्या दोन संस्था; २०२४ मध्ये स्थापन संस्थेच्या संचालक मंडळाचा बोर्डिंगच्या जागेशी संबंध नसल्याचा दावा
धर्मादाय आयुक्तांकडे संस्थेच्या नावावर मालमत्ता नसल्याचे कागदपत्रांसह सादरीकरण; जागा हडपण्याचा डाव असल्याचा आरोप
मनमाड, प्रतिनिधी ता.१ :
डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रमाच्या दलित शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी मनमानी कारभार करत असून बोर्डिंगच्या ऐतिहासिक मालमत्तेवर बेकायदेशीर कब्जा मिळवून ती हडपण्याचा डाव आखला जात असल्याचा गंभीर आरोप संस्थेच्या माजी पदाधिकारी, सदस्य आणि संचालकांच्या वारसांनी केला आहे. एकाच नावाने दोन संस्था अस्तित्वात असून २०२४ मध्ये नोंदणी झालेल्या संस्थेच्या संचालक मंडळाचा बोर्डिंगच्या जागेशी कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी कागदपत्रांसह केला. या प्रकरणी संबंधितांविरोधात कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
येथील भाग्यश्री हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेच्या आजीव सदस्य तथा माजी संचालिका सुरेखा पवार, अनिल निरभवणे, नरेन संसारे आणि ॲड. मनीष रनशूर यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी संस्थेच्या विद्यमान अध्यक्ष कुणाल गायकवाड, पी. एस. गायकवाड आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर आक्षेप घेतला.
बाबासाहेबांच्या हस्ते भूमिपूजन, पवार कुटुंबीयांनी दिली जागा
डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रमाची स्थापना कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या प्रयत्नांतून झाली. या बोर्डिंगचे भूमिपूजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते १९४५ मध्ये तर उद्घाटन १७ नोव्हेंबर १९५१ रोजी झाल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. बोर्डिंगसाठी जागा त्यांचे सासरे आर. आर. पवार यांनी दान दिली होती. अनेक वर्षे शांताबाई दाणी, गहिनाजी संसारे, विनायक संसारे, उत्तम निरभवणे यांच्यासह अनेकांनी ही सर्वात जुनी स्थापन झालेली संस्था सांभाळली. पवार कुटुंबीयांनी संस्थेसाठी मोठे योगदान दिले असताना, सध्याच्या पदाधिकाऱ्यांकडून जागेवर अनधिकृत कब्जा मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला.
एकाच नावाच्या दोन संस्था; नवीन संस्थेत जागेची नोंद नसल्याचा दावा
नाशिक जिल्हा दलित शिक्षण प्रसारक मंडळ या नावाने दोन स्वतंत्र संस्था अस्तित्वात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. एक संस्था बोर्डिंग स्थापनेवेळी स्थापना करण्यात आली तीच संस्था कारभार पाहत होती तर २०२४ मध्ये याच नावाने धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झालेल्या संस्थेचे विद्यमान संचालक मंडळ असल्याचे सांगण्यात आले. मात्र, धर्मादाय आयुक्तांकडे नोंदविलेल्या संस्थेच्या अभिलेखांमध्ये डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रमाच्या बोर्डिंगची जागा संस्थेच्या मालकीची असल्याची नोंद नाही. तसेच या संचालक मंडळाचा सदर जागेशी कोणताही संबंध नसल्याचा दावा सुरेखा पवार, अनिल निरभवणे आणि नरेन संसारे यांनी केला. यासंदर्भातील काही कागदपत्रेही त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केली.
जागा विकण्याचा डाव सहन करणार नाही
बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक जागेवर अनधिकृत कब्जा मिळवून ती विकण्याचा किंवा हडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. ही जागा केवळ मालमत्ता नसून आंबेडकरी समाजाची अस्मिता आणि ऐतिहासिक वारसा आहे. त्यामुळे जागा विकून देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जागेची मातीसुद्धा कुणाला घेऊन देणार नाही अशी ठाम भूमिका वारसांनी व्यक्त केली. या प्रकरणात संबंधितांविरोधात कायदेशीर कार्यवाही सुरू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रेरणाभूमीच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाची तयारी
दरम्यान प्रेरणाभूमी विकास कृती समितीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या परिसराचा ऐतिहासिक वारसा जतन करून त्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मनमाड नगर परिषदेच्या कौन्सिलने या परिसराला ‘प्रेरणाभूमी’ नाव देण्याचा ठराव केला असून पुरातत्त्व विभागाने या स्थळाला ऐतिहासिक वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे. शासनाकडेही सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या प्रेरणाभूमीच्या कार्यक्रमाला हे संस्था चालक विरोध करत आहे हा विरोध प्रेरणाभूमीला नाही तर आंबेडकरी समाजाला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून या परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून यंदा डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रमाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने अमृतमहोत्सवी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी संबंधित संस्था आणि प्रेरणाभूमी विकास कृती समितीने पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. दोन्हींकडून आलेल्या मागण्यांचा विचार करून पोलीस निरीक्षक विजय करे यांनी परवानगीचा प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठविल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

