
नाशिक :(प्रतिनिधी )देवळा महाविद्यालयाचे प्राचार्य तथा देवळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर हे नुकतेच नियत वयोमानानुसार सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी सुमारे ३५ वर्षे प्राचार्य म्हणून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय सेवा बजावली. पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात प्रदीर्घ काळ प्राचार्यपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला. तसेच देवळा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी संस्थेच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे. यापुढेही ते संस्थेच्या कार्यात सक्रिय राहणार आहेत.
त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेबद्दल आणि उल्लेखनीय कार्याबद्दल नाशिक येथे प्राचार्य डॉ. रावसाहेब शिंदे, प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ, प्राचार्य डॉ. हरीश आडके, प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ. रावसाहेब शिंदे यांनी डॉ. हितेंद्र आहेर यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचे कौतुक करून त्यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय योगदानाचा गौरव केला. प्राचार्य डॉ. हरीश आडके यांनी त्यांच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेत पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या कार्यातील विविध पैलूंना उजाळा देत त्यांनी आहेर यांच्या कार्याचा गौरव केला.
प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी डॉ. हितेंद्र आहेर यांच्या मनमिळाऊ स्वभावाचा, सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध जपण्याच्या वृत्तीचा आणि सुख-दुःखाच्या प्रसंगी आवर्जून उपस्थित राहण्याच्या त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा उल्लेख केला. कोणाशीही संवादात अंतर न ठेवता सर्वांशी सातत्याने संपर्क राखण्याची त्यांची हातोटी ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ यांनी समारोपाच्या भाषणात डॉ. आहेर यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा गौरव करत त्यांच्या शैक्षणिक व संस्थात्मक योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले.
या कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे आणि प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

