
नाशिकरोड:-( प्रतिनिधी ) पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुलेखन आणि काव्यनिर्मिती कार्यशाळेत व्याख्यात्यांच्या सखोल मार्गदर्शनातून अनुभवांची शिदोरी अनुभवली.
नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड, नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे यांच्या प्रेरणेने आणि मुख्याध्यापक अरुण पगार, शिक्षक-कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या कार्यशाळेत ११२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
पहिले पुष्प गुंफताना समुपदेशक आणि सुलेखनकार प्रा.राजेश्वर शेळके यांनी सुलेखनासाठी घ्यावयाची काळजी, अक्षरांचे आकार, शुद्धलेखनाची बाराखडी याविषयी सखोल आणि सप्रयोग मार्गदर्शन केले. द्वितीय पुष्प गुंफताना सुप्रसिद्ध व्याख्यात्या डॉ.अंजना भंडारी यांनी बौद्धिक खेळ घेत विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकली. तसेच कल्पनाशक्ती आणि शब्दसंग्रह वाढवण्यासाठी कौशल्य विकसित करण्याचे आवाहन केले.
काव्यनिर्मिती या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना सुप्रसिद्ध कवी-गीतकार राजेंद्र सोमवंशी, युवाकवी प्रशांत केंदळे यांनी काव्यनिर्मितीसाठी वाचन, मनन, चिंतन आणि निरीक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगितले. युवाकवी प्रशांत केंदळे यांनी ‘पाटी-पुस्तक-दप्तर आहे, शाळा माझी सुंदर आहे!’ आणि कवी राजेंद्र सोमवंशी यांनी इयत्ता चौथीच्या बालभारती पुस्तकातील त्यांची ‘साऱ्यांनी मिळून ठरवायचं, शाळेला छान-छान बनवायचं!’ अशा एकापेक्षा एक सरस कविता सादर करून काव्यनिर्मितीची प्रक्रिया उलगडून दाखवली. बौद्धिक खेळातील कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांसह विशिष्ट शब्दांचा वापर करून काव्यलेखन केलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले.
सुधाकर गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेचा समारोप झाला. माजी विद्यार्थी आणि श्रीमंत श्री नर्सरीचे संचालक कवी शरद आडके, माजी सैनिक विजय शिंदे, कामगार नेते प्रशांत कापसे, मुख्याध्यापक अरुण पगार, ज्येष्ठ शिक्षक विजय पाटील मंचावर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच इतर क्षेत्रात ज्ञान मिळवून सर्वार्थाने गुणवंत होण्याचा सल्ला दिला. कवी शरद आडके यांनी कविता सादर केली. रवींद्र मालुंजकर यांनी निवेदन केले. कैलास लहांगे यांनी आभार मानले.

