
प्रलंबित शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मुख्याध्यापक संघाची मागणी
नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने प्रभारी शिक्षणाधिकारी श्री. नरेश पाटील साहेब आणि राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री. एस. बी. देशमुख यांच्या समवेत विविध शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीचे प्रास्ताविक नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. प्रदीप सांगळे यांनी केले त्यांनी शिक्षणाधिकारी श्री. नरेश पाटील साहेब यांनी प्रभारी शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत. यामध्ये मुख्याध्यापकांच्या सह्यांचे अधिकार, सेवानिवृत्त शिक्षकांचे विविध प्रस्ताव, मासिक वेतन देयकांना मंजुरी तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या जन्मतारीख व नावातील बदलासंदर्भातील प्रस्ताव तातडीने निकाली काढण्यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे. त्यांच्या कार्यतत्परतेबद्दल मुख्याध्यापक संघाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक संघाच्या वतीने श्री एस बी देशमुख यांनी वेतनेतर अनुदानाचे वितरण, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे रजा रोखीकरण प्रस्ताव मंजूर करणे, मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या प्रलंबित मान्यता तातडीने देणे, तसेच संस्थांतर्गत वादामुळे प्रलंबित असलेले प्रश्न शिक्षणाधिकारी यांनी आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून मार्गी लावावेत, अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या.
बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. शिक्षक व मुख्याध्यापकांच्या प्रलंबित प्रशासकीय कामांना गती मिळावी आणि शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी शिक्षणाधिकारी श्री नरेश पाटील साहेब यांनी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री प्रदीप सांगळे यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार केला व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच प्रभारी शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्या बद्दल श्री नरेश पाटील साहेब यांचा मुख्याध्यापक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या बैठकीस राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री. एस. बी. देशमुख, जिल्हाध्यक्ष श्री. प्रदीप सांगळे, शहराध्यक्ष श्री. सुरेश घरटे, श्री. अनिल माळी, श्री. भागीरथ घोटेकर, मुख्याध्यापक श्री. अरुण पवार, श्री. बाळासाहेब ढोबळे, श्री. बी. के. नागरे, श्री. धनंजय पाठक, श्री. रघुनाथ गायकवाड शहर सहसचिव माधुरी पेखळे,जागृती टिळे, संध्या पवार, केशव ठोंबरे, प्रमोद लव्हाणगळे आदी उपस्थित होते. शेवटी सभेचे आभार शहराध्यक्ष श्री सुरेश घरटे यांनी व्यक्त केले

