
मुंबई:
प्रसिद्ध अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी घेतलेल्या जंगलतोड विरोधी भूमिकेला बहुजन मुक्ती आंदोलन महाराष्ट्र राज्य या संघटनेने जाहीर समर्थन दिले आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रविण जगताप यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्विट’ (X) द्वारे सयाजी शिंदे यांचे कौतुक करत, निसर्गाचा विनाश करणाऱ्या सरकारी धोरणांवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे.

“निसर्गासाठी लढणारा खरा ‘नायक’!” अशा शब्दांत प्रविण जगताप यांनी सयाजी शिंदे यांचा गौरव केला. विकासकामांच्या नावाखाली सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृक्षतोडीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
आपल्या ट्विटमध्ये सरकारला थेट जाब विचारताना जगताप म्हणाले, “निसर्गाचा विनाश करणाऱ्या धोरणांवर सरकार कधी लगाम घालणार? विकासाच्या नावाखाली सुरू असलेला हा निसर्गाचा छळ आता थांबलाच पाहिजे!”
सयाजी शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून ‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे मोठे काम करत आहेत. अलीकडच्या काळात विविध विकास प्रकल्पांसाठी होणाऱ्या बेसुमार जंगलतोडीविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता त्यांच्या या लढ्याला राजकीय आणि सामाजिक स्तरावरूनही पाठबळ मिळताना दिसत असून, बहुजन मुक्ती आंदोलनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे पर्यावरण रक्षणाचा हा मुद्दा अधिक तापण्याची शक्यता आहे.

