

लेखक :- प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
काँग्रेस नगर, अमरावती.
भ्रमणध्वनी : ८०८७७४८६९.
स्त्री उद्धाराचे शिल्पकार, क्रांतीची पाऊलवाट जगणारे, १०४ वर्षाचे आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण करणारे,एक ध्येयवादी व .समर्पित जीवन जगणारे, स्त्री शिक्षणाचे महामेरू, जिवंतपणीच पोस्टाचे तिकीट निघणारे भारतातील पहिले समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दि.९ नोव्हेंबर २०२६ रोजी असलेल्या ६४ व्या स्मृतिदिनानिमित्त
विनम्र अभिवादन!
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म १८५८ सालातील एप्रिल महिन्याच्या १८ तारखेला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेरावली या गावी झाला. त्यांना समाजकार्यात खूप रुची होती. त्यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनमोल कार्य लक्षात घेऊन लोक त्यांना आदराने ‘अण्णासाहेब कर्वे’ किंवा ‘महर्षी कर्वे’ म्हणत. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुरुड येथे झाले आणि त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत आपले शिक्षण पूर्ण केले.
त्यांनी मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून १८८४ मध्ये गणितातून बी.ए. (B.A.) ची पदवी संपादन केली.नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून नोकरी सुरू केली. १८९१ ते १९१४ या प्रदीर्घ काळात त्यांनी प्राध्यापक म्हणून उत्तम सेवा दिली. महर्षी कर्वे यांचा पहिला विवाह राधाबाईंशी झाला होता,परंतु १८९१ मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले.
त्यांनी स्वतःच्या आचरणातून सुधारणेचा धडा देण्यासाठी ११ मार्च १८९३ रोजी गोदुबाई (आनंदीबाई) या एका विधवा महिलेशी पुनर्विवाह केला.तत्कालीन सनातनी समाजाने त्यांच्या या विधवा पुनर्विवाहावर तीव्र आक्षेप घेत त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला.
या बहिष्काराला न डगमगता त्यांनी स्त्री-उद्धार आणि विधवांच्या कल्याणासाठी स्वतःला वाहून घेण्याचा निश्चय केला.
१८९३ मध्ये त्यांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळ ‘ स्थापन करून विधवा विवाहाचा प्रसार केला. अनाथ, निराधार आणि विधवा महिलांना हक्काचे स्थान मिळावे म्हणून त्यांनी १८९६ मध्ये
‘ अनाथ बालिकाश्रम ‘ संस्थेची स्थापना केली. ही संस्था सुरुवातीला पुण्यात आणि नंतर पुण्याजवळील हिंगणे येथे स्थलांतरित करण्यात आली. मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी १९०७ मध्ये त्यांनी ‘ महिला विद्यालया’ची स्थापना केली.
१९०८ मध्ये त्यांनी समाजसेवेसाठी पूर्णवेळ कार्यकर्ते तयार करण्याच्या उद्देशाने ‘निष्काम कर्ममठ’ स्थापन केला. जपानमधील महिला विद्यापीठापासून प्रेरणा घेऊन त्यांनी भारतात केवळ महिलांसाठी ३ जून १९१६ रोजी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. प्रसिद्ध उद्योगपती
विठ्ठलदास ठाकरसी यांनी या विद्यापीठाला १५ लाख रुपयांची मोठी देणगी दिली.
म्हणूनच या विद्यापीठाचे नाव बदलून ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (SNDT) महिला विद्यापीठ’ असे ठेवण्यात आले.स्त्री-शिक्षण हेच देशाच्या प्रगतीचे मूळ आहे, असा महर्षी कर्वे यांचा ठाम विश्वास होता.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी संस्थेचा प्रचार आणि निधी संकलनासाठी युरोप, अमेरिका आणि आफ्रिका या देशांचा दौरा केला होता.परदेश दौऱ्यादरम्यान त्यांची महान वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्याशी भेट झाली होती. त्यांनी मराठीत ‘आत्मवृत्त’ (१९२८) आणि इंग्रजीत ‘लुकिंग बॅक’ (१९३६) ही आपली आत्मचरित्रे लिहिली. सामाजिक विषमतेविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी
‘ समता संघ ‘ आणि ‘जातीभेद निवारक मंडळ’ स्थापन केले.
त्यांच्या या महान आणि अतुलनीय कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बहुमान मिळाले.
१९५५ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘ पद्मविभूषण’ हा देशातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात, म्हणजेच १९५८ मध्ये त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ भारतरत्न ‘ देऊन गौरविण्यात आले. जिवंतपणीच पोस्टाचे तिकीट निघणारे महर्षी धोंडो केशव कर्वे हे भारतातील पहिले समाजसुधारक ठरले.वयाची शंभरी ओलांडलेले महर्षी कर्वे तब्बल १०४ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य समाजसेवेसाठी जगले. असे हे .थोर ज्ञानमहर्षीं १९६२ सालातील नोव्हेंबर महिन्याच्या नऊ तारखेला पंचतत्वात विलीन झाले.
अशा या थोर तपस्वीला ६४ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !
थोर महर्षीला । करितो नमन ॥
करांनी वंदन । स्मृतिदिनी ॥
राज्यस्तरीय महात्मा फुले
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
साहित्यिक व अभंगकार
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
काँग्रेस नगर, अमरावती.
भ्रमणध्वनी : ८०८७७४८६९.

