
सिन्नर, ( प्रतिनिधी ) : मातोश्री चं. व अ. चांडक कन्या विद्यालयाचा हीरक महोत्सवी वर्धापनदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यालयाने ६० वर्षांची गौरवशाली वाटचाल पूर्ण केल्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय होते. प्रमुख पाहुण्या म्हणून विद्यालयाच्या देणगीदार भूमी चांडक व आरटीएफ प्लांट मॅनेजर, सिन्नर रुपाली दंडवते उपस्थित होत्या. यावेळी हीरक महोत्सव समितीच्या उपाध्यक्षा माधवी पंडित, विस्तार अधिकारी
विजय बागुल, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे, माजी मुख्याध्यापिका प्रज्ञा महाले, सुनीता कर्डिले,
प्रभारी मुख्याध्यापिका सुवर्णा सोनवणे व शिक्षक प्रतिनिधी प्रिया कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांनी विद्यालयाला शुभेच्छा देत विद्यार्थिनींना “मोठी स्वप्ने बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी स्वतःला सक्षम बनवा,” असा प्रेरणादायी संदेश दिला. सुवर्णा सोनवणे यांनी प्रास्ताविकातून विद्यालयाच्या ६० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला.
निलिमा दुसाने यांनी सूत्रसंचालन केले, तर उमा लोकरे यांनी मान्यवरांचे स्वागत व परिचय करून दिला. प्रमुख पाहुण्यांच्या प्रेरणादायी प्रवासाची मुलाखतीच्या माध्यमातून संयुक्ता कुलकर्णी यांनी ओळख करून दिली. कु. आरोही ठोके हिने ‘मी शाळा बोलते’ हे मनोगत सादर केले. गीतमंचाने स्वागतगीत सादर केले.

श्रावण शुक्रवारनिमित्त माता पालकांसाठी हळदी-कुंकू व मातृपूजनाचा कार्यक्रमही घेण्यात आला. माता पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शालेय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

