
इटींग गिल्बर्ट ग्रेप
नाशिक (प्रतिनिधी) : विश्वास ग्रुप व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा जलालपूर, नाशिकतर्फे चित्रपट प्रेमींसाठी ‘सिनेमा कट्टा’ उपक्रमांतर्गत ,शुक्रवार 11 सप्टेंबर 2026रोजी सायंकाळी 6 वाजता
व्हॉट इज इटींग गिल्बर्ट ग्रेप हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ,लास्स हालस्त्रम आहेत.
सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास गार्डन शेजारी), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार
अमेरिकेतील आयोवा राज्यातील हजारएक वस्तीचं एक आडबाजूचं लहानसं शहर इर्गेंडवो. अशा लहानशा गावांमध्ये जसं चालतं तसंच चाललं आहे तिथलं जीवन – संथ, एकसुरी, रंगहीन, सपक. तेच ते रहाटगाडगं. निदान वरवर पाहता तरी ते तसंच दिसतं. तिथे राहतोय एक विशीतला तरुण गिल्बर्ट ग्रेप. तो तिथल्या किराणा मालाच्या दुकानात काम करतोय. प्रेमळ, सालस, काहीसा स्थितप्रज्ञ, कर्तव्यदक्ष, येईल त्या परिस्थितीशी जुळवून घेणारा.
पण गिल्बर्ट अस्वस्थही आहे. त्याचा लहान भाऊ आर्नी थोडा मतिमंद आहे. त्याला सांभाळण्याची जबाबदारी त्याने स्वीकारली आहे. सातेक वर्षांपूर्वी वडिलांनी तळघरात आत्महत्या केलीय. तेव्हापासून त्याच्या आईने घराबाहेर एक पाऊलही टाकले नाहीय. तिचे वजन वाढत जाऊन आज ५०० पौंड झालेलं आहे. त्याच्या दोन बहिणींपैकी मोठीची नोकरी नुकतीच सुटलीय आणि धाकटीने त्याच्याशी उभा दावा मांडलेला आहे. शहराच्या कडेला नवीन सुपरमार्केट झालंय ज्याच्यामुळे त्याच्या मालकाचं दुकान धोक्यात येऊ लागलंय. घर जुनं होत चाललंय… खरं तर आश्चर्य हे आहे की तरीही हा गृहस्थ इतका शांत कसा राहू शकतो!
चित्रपट सुरू होतो तेव्हा आर्नी आणि गिल्बर्ट एका काफिल्याची वाट पाहत असतात. हा काफिला आहे ट्रेलर- घरांचा, चाकावरची घरं. अशी घरं घेऊन त्यातून फिरस्तीची जीवनपद्धती अंगिकारणारा एक समूहच आहे अमेरिकेमध्ये. त्यांचे ठरलेले मार्ग असतात आणि ठरलेली मुक्कामाची ठिकाणं. दरवर्षी ठराविक दिवशी हा ट्रेलर फिरस्त्यांचा काफिला इर्गेंडवोच्या जरा बाहेर एका मैदानात काही दिवसांसाठी पडाव टाकतो. हा काफिला गिल्बर्टच्या जीवनात एक झुळुक घेऊन येतो.
याआधी अशाच एका स्विडिश गावातल्या वल्लींबाबत ’माय लाईफ ॲज अ डॉग’ नावाचा छानसा चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या लास्स हालस्त्रम यांनी तितक्याच आस्थेने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. सतत स्थितप्रज्ञता आणि भावनात्मकतेच्या सीमारेषेवर वावरणारा गिल्बर्ट जॉनी डेपने आपल्यातला हीरो बाजूला ठेवून छान साकार केला आहे. क्षणात भावुक होणारी, क्षणात अपराधी भावनेने घेरली जाणारी आणि क्षणात जवळपास कोडगेपणाने आपले चोचले पुरवून घेणारी गिल्बर्टची महास्थूल आई डार्लीन केट्सने अत्यंत समर्थपणे उभी केली आहे. पण या सर्वांवर कडी करतो तो लिओनार्डोचा आर्नी. लिओनार्डो मोठा नट आहे पण त्याची प्रतिमाच एवढी उंच झाली आहे की त्याच्या अलीकडच्या पात्रांमध्ये ती सारखी सारखी डोकावते. आर्नीमध्ये मात्र लिओनार्डो तिळमात्रही उरत नाही, राहतो तो फक्त आणि फक्त डोक्याला ताप देणारा, काही समजून न घेऊ शकणारा अन तरीही निरागस आणि हृद्य आर्नी.
1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा कालावधी 1 तास 58 मिनिटे आहे.
हा चित्रपट पाहण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास लीलावती जयदेव ठाकूर ,विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज कमल एकनाथ शिंपी,
रेडिओ विश्वासच्या कार्यकारी संचालक ऋचिता महाजन-ठाकूर यांनी केले आहे.

