
जागतिक क्रीडा पत्रकार दिन (World Sports Journalists Day) दरवर्षी २ जुलै रोजी जगभरात साजरा केला जातो. खेळाडूंची मेहनत, त्यांची यशोगाथा आणि क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक लहान मोठी बातमी क्रीडाप्रेमी पर्यंत पोहोचवणाऱ्या क्रीडा पत्रकारांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संघटनेची स्थापना २ जुलै १९२४ रोजी पॅरिस ऑलिम्पिक दरम्यान झाली. या संघटनेच्या स्थापनेच्या स्मरणार्थ, १९९४ पासून दरवर्षी २ जुलै रोजी हा विशेष दिवस जागतिक स्तरावर पाळला जातो. क्रीडा पत्रकार प्रेक्षकांना केवळ सामन्यांचे थेट अपडेट्स, आकडेवारी किंवा निकालच देत नाहीत, तर खेळाडूंच्या संघर्षाच्या आणि विजयाच्या प्रेरणादायी कहाण्याही आपल्या पर्यंत पोहोचवतात. क्रीडा पत्रकार वेगवेगळ्या माध्यमातून क्रीडा संस्कृतीला पुढे नेण्याचे काम करतात; १) प्रिंट मीडिया : वृत्तपत्रे आणि क्रीडा मासिके, २) डिजिटल प्लॅटफॉर्म : सोशल मीडिया, न्यूज वेबसाइट्स आणि ब्लॉग्स, ३) दूरदर्शन आणि रेडिओ : थेट सामन्यांचे समालोचन आणि क्रीडा विश्लेषण.

