
धैर्य भांगडिया व शाश्वत कुरलिये यांना सुवर्णपदक; विभागीय स्तरासाठी निवड
सेलू 🙁 प्रतिनिधी ) बोर्डीकर्स पोदार लर्न स्कूल, सेलू येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेत शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले असून त्यांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
इयत्ता दुसरीतील विद्यार्थी धैर्य भांगडिया आणि इयत्ता चौथीतील विद्यार्थी शाश्वत कुरलिये यांनी जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेत आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. दोन्ही विद्यार्थ्यांनी प्रतिस्पर्ध्यांना प्रभावीपणे सामोरे जात गोल्ड मेडल मिळविले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची पुढील विभागीय स्तरावरील वुशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अल्पवयातच विद्यार्थ्यांनी दाखविलेली जिद्द, आत्मविश्वास, शिस्त, चिकाटी आणि क्रीडाकौशल्य निश्चितच कौतुकास्पद आहे. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे शाळेचे धोरण या यशातून अधोरेखित झाले आहे.
या यशासाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका रितू श्रीवास्तव मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ. भावनाताई बोर्डीकर (मुंगसे) यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आगामी विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. धैर्य भांगडिया आणि शाश्वत कुरलिये हे विभागीय स्तरावरही उत्तम कामगिरी करून शाळेचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

