
लोहोणेर येथील जनता विद्यालयात उपक्रमशील शिक्षक सुनील एखंडे यांनी विद्यालयाला भेट दिलेल्या ६१ राष्ट्रपुरुष व क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे अनावरण करताना उपस्थित मान्यवर, मुख्याध्यापक जिभाऊ शिर्के व सांस्कृतिक समिती प्रमुख सुनील एखंडे. (छाया : सुनील एखंडे)
लोहोणेर : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयातील उपक्रमशील व सांस्कृतिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे शिक्षक सुनील एखंडे यांनी विद्यालयाला थोर राष्ट्रपुरुष, समाजसुधारक, संत, विचारवंत व क्रांतिकारकांच्या तब्बल ६१ प्रतिमा भेट देऊन एक आगळावेगळा शैक्षणिक व प्रेरणादायी उपक्रम राबविला.मराठा विद्या प्रसारक समाज दिनाचे औचित्य साधून शिक्षक सुनील एखंडे यांनी या प्रतिमा विद्यालयाला भेट दिल्या. विद्यालयात आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या प्रतिमांचे अनावरण करण्यात आले. या उपक्रमामुळे शाळेच्या परिसराला ऐतिहासिक, वैचारिक आणि प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले आहे.विद्यालयात वर्षभर विविध महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम उत्साहात साजरे केले जातात. विद्यार्थ्यांना या राष्ट्रपुरुषांचे कार्य, त्याग, विचार, संघर्ष आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान यांची सातत्याने ओळख व्हावी, तसेच त्यांच्या जीवनातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या प्रतिमा भेट देण्यात आल्याचे मुख्याध्यापक जिभाऊ शिर्के यांनी सांगितले. महापुरुषांच्या प्रतिमा केवळ भिंतीवरील चित्रे नसून विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांशी जोडणारे ‘प्रेरणादायी ज्ञानदालन’ ठरावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. विविध राष्ट्रीय दिन, जयंती, पुण्यतिथी तसेच शालेय सांस्कृतिक उपक्रमांच्या वेळी या प्रतिमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संबंधित महापुरुषांच्या कार्याची माहिती देणे अधिक प्रभावी होणार आहे.शिक्षक सुनील एखंडे हे अध्यापनाबरोबरच शालेय सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि तंत्रज्ञानाधारित विविध उपक्रमांमध्ये सातत्याने पुढाकार घेत असतात. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी, इतिहासाची जाण आणि महापुरुषांच्या विचारांविषयी आदर निर्माण व्हावा, या दृष्टिकोनातून त्यांनी केलेली ही प्रतिमांची भेट विशेष उल्लेखनीय ठरली.या उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवर भैय्यासाहेब देशमुख, नितीन आहेर, रमेश आहिरे, यशवंत शेवाळे, रुपाली धामणे, दिगंबर कोठावदे,डॉ.सुभाष आहेरसर्व समिती सदस्य, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सुनील एखंडे यांचे कौतुक करून अभिनंदन केले.विद्यालयासाठी ६१ महापुरुषांच्या प्रतिमांची केलेली ही भेट विद्यार्थ्यांच्या भावी पिढीला प्रेरणा देणारी आणि शाळेच्या शैक्षणिक वातावरणात सकारात्मक मूल्यांची रुजवण करणारी ठरणार आहे.

विद्यालयाला ६१ राष्ट्रपुरुष व क्रांतिकारकांच्या प्रतिमा भेट देण्यामागे विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनकार्याची प्रेरणा मिळावी, त्यांच्या विचारांचे स्मरण व्हावे आणि जयंती-पुण्यतिथी कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण व्हावेत, हा व्यापक शैक्षणिक दृष्टिकोन आहे.“महापुरुषांच्या प्रतिमा विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांची आणि कार्याची सतत आठवण करून देत राहतील. या विचारांतूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होईल.”
सुनील एखंडे,(सांस्कृतिक समिती प्रमुख)
शिक्षक सुनील एखंडे यांनी विद्यालयाला भेट दिलेल्या ६१ प्रतिमा या उपक्रमांना अधिक प्रभावी आणि दृश्यमान स्वरूप देणाऱ्या ठरणार आहेत. विद्यार्थ्यांना दररोज शाळेच्या परिसरात राष्ट्रपुरुषांचे दर्शन घडेल व त्यांच्या कार्याविषयी जिज्ञासा निर्माण होऊन राष्ट्रप्रेम, त्याग, सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यभावनेचे संस्कार रुजण्यास निश्चितच मदत होईल.शाळेतील भिंती केवळ सजावटीच्या न राहता त्या विद्यार्थ्यांना इतिहास, संस्कार आणि प्रेरणा देणाऱ्या असाव्यात. ६१ प्रतिमांची ही भेट विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.”
जिभाऊ शिर्के, (मुख्याध्यापक)

