शब्दांकन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे व समस्त अहिरे परिवार, दाभाडी ता. मालेगाव जि. नाशिक

सुमने होऊनी गळूनी पडावे
प्रभूच्या पदकमळाशी
देह झिजावा अखंडित
हा ज्ञानदान साधनेशी.
ही एकच तळमळ सतत मनात ठेवून नवभारताचे आधारस्तंभ असणारी विद्यार्थीरुपी शिल्पे घडवण्यात सतत कार्यमग्न असणार्या जेष्ठ शिक्षिका आदरणीय श्रीमती बिजलाबाई भिका दुकळे ऊर्फ काळे मॅडम आज आपण ३३ वर्षांच्या अविरत ज्ञानदानाच्या पवित्र कार्यातून सेवानिवृत्त (स्वेच्छानिवृत्ती) होत आहात. त्यानिमित्ताने हा शब्दप्रपंच....
काळे मॅडम यांचा जन्म सुकी नदीच्या तिरावर वसलेल्या जळगाव निंबायती या गावी ८ ऑक्टोबर १९७३ रोजी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. काळ्या आईची सेवा करत आयुष्यभर प्रामाणिकतेने मातीत राबणाऱ्या देवभोळ्या आईवडीलांच्या कष्टाचे विस्मरण आपणास कधीही झाले नाही हे विशेष. आपल्या अंगी असणारी शिस्त, प्रामाणिकपणा, ग्रामीण विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ, संस्काराचा वसा आणि वारसा आपल्या ठायी नित्य अनुभवास मिळतो. काळे मॅडम यांचा वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी त्या ४ थीला असतांनाच श्री. व्ही. डी. काळे सरांबरोबर साखरपुडा झाला. पूर्वी त्या ग्रामीण प्रथेला 'कुंकू मांगण' असं म्हणायचे. तद्नंतर इयत्ता ४ थी ते १० वी व डी. एड. पर्यंतचे शिक्षण दोघांचे बरोबरच झालेले आहे. हा विशेष उल्लेख येथे करावा लागेल. काळे सरांच्या आई-वडलांना वाटत होत की काळे सरांना २ री मध्येच लिहीता-वाचता येतं. सही येते, म्हणून आता शिक्षण पुरे झालं. आता त्यांच्या धाकट्या भावाला शिक्षण द्यावं व सरांना शेतीकामाला लावावं. मात्र मॅडम यांनी सासू-सासर्यांकडे शिक्षणासाठी आग्रह केल्याने त्या काळातील सामाजिक परिस्थितीत देखील सरांच्या माता-पित्यांनी पुरोगामी विचार करुन काळे सर व मॅडम या दोघांचे डी. एड पर्यंतचे शिक्षण होऊ दिले. त्यामुळे काळे सर आज प्राचार्य पदापर्यंत पोहोचलेत. यात खऱ्या अर्थाने त्यांच्या आई-वडीलांबरोबरच मॅडम यांचा देखील सिंहाचा वाटा आहे हे नमूद करावे लागेल.
जळगाव निंबायतीचे आधारवट, पंचक्रोशीचे विकास पुरुष, शिक्षण महर्षी, वृक्षमित्र स्वर्गीय रोडूआण्णा पाटील साहेब यांच्या परिकल्पनेतून तथा अथक परिश्रमातून साकारलेल्या नाशिक जिल्हा अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, या नामांकित विद्यालयातून काळे मॅडम यांनी १२ जून १९९५ पासून ज्ञानदानाच्या कार्याचा श्रीगणेशा केला. तत्पूर्वी त्यांनी दोन वर्ष विनाअनुदानित तत्वावर सेवा दिली. तब्बल ३३ वर्षे २ महिन्यांच्या प्रदिर्घ सेवेत आपण अध्यापनाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे.
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते II३-२१II
एक विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षिका, विविध विषयांवर असलेले प्रभुत्व, सखोल विषय ज्ञान, ओघवती भाषाशैली, प्रभावी अध्यापन कौशल्य, मधुर वाणी उपक्रमशिलता, प्रयोगशीलता, कल्पकता, नाविन्यपूर्णता आदी अध्यापनाची गुणवैशिष्ट्ये काळे मॅडम यांच्या ठायी एकवटली आहेत. सतत हसतमुख व प्रसन्न व्यक्तीमत्व, आपल्यात अंगीकृत असलेली परोपकारी वृत्ती, धार्मिकतेचे अधिष्ठान, माणूस जोडण्याचा व्यासंग, कर्तव्यावरील निष्ठा आणि सह अध्यायी शिक्षक शिक्षिका व कर्मचारी बंधु-भगिनींच्या सुख दुःखात सहभागी होण्याची धडपड, परमेश्वरावर अढळ श्रद्धा, संकटांना न जुमानणारी दिल-खूलास जीवन जगण्याची कला, निर्गवी व्यक्तिमत्त्व, संवेदनशील आणि निर्मळ मनाचा नेहमीच खळाळणारा झरा, सगळ्यांचे कल्याण होवो ही वृत्ती व कृती. सतत नितीमूल्य जपणाऱ्या समतेच्या वारकरी मॅडम आपण ३३ वर्षांच्या प्रदिर्घ सेवेतून ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सेवानिवृत्त म्हणजे तब्बल पाच वर्ष सेवा शिल्लक असतांना देखील स्वेच्छानिवृत्ती घेत आहात. गत १८ वर्षांच्या माझ्या सेवा काळात स्वेच्छानिवृत्ती बाबत अनेक सहकारी वृंदाच्या मी केवळ वल्गनाच ऐकल्यात, मात्र खऱ्या अर्थाने आपण केलेली प्रत्यक्ष कृती आज अनुभवास मिळत आहे. या शैक्षणिक क्षेत्रातील प्रदिर्घ सेवेतून निवृत होतांना आम्हा सर्व सहकारी बांधवांना मनस्वी दुःख होत आहे. अर्थात आम्ही देखील तुमच्याच वाटेने मार्गक्रमण करणारे शिक्षणरुपी ज्ञानदिंडीतील वारकरी आहोत…
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी
नजरेत सदा नवी दिशा असावी
घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण
क्षितिजापलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी.
असा दुर्दम्य आशावाद विद्यार्थ्यांमध्ये सतत जागविणाऱ्या काळे मॅडम यांचे प्रेरणादायी व्यक्तित्व आहे. अत्यंत प्रामाणिक, पारदर्शी, सूशिक्षित व सूसंस्कारी महिला म्हणून काळे मॅडम यांना स्वर्गीय आण्णासाहेबांनी सन २००० साली गावाच्या सरपंच पदाची जबाबदारी मोठ्या विश्वासाने दिली. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’ ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची अत्यंत प्रसिद्ध ओळ मॅडम यांनी सार्थ करुन दाखवली. आपल्या कुटुंबाची, शाळेतील विद्यार्थ्यांची व गावाच्या प्रथम नागरिक, सरपंच, पालक म्हणून सर्व गावाची धुरा काळे मॅडम यांनी अतिशय समर्थपणे सांभाळली. किंबहुना स्वर्गीय आण्णासाहेबांच्या मार्गदर्शनातून गावात विविध विकासकामे, विशेषतः ग्राम स्वच्छता अभियान राबविले. याचाच परिपाक म्हणून महाराष्ट्र शासनाचा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा पुरस्कार तत्कालीन ग्रामविकासमंत्री आर. आर. पाटील साहेब यांच्याहस्ते जळगाव निंबायती ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून काळे मॅडम यांनी स्विकारला हा खऱ्या अर्थाने त्यांच्या नि:स्वार्थपणे केलेल्या कार्याचा सन्मानच म्हणावा लागेल. तद्नंतर सन २०११ ते २०१५ त्या कृष्णानंद नगर या वार्ड मधून बिनविरोध निवडून आल्या होत्या.

सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती
पंखास या बळ दे नवे, झेपावण्या आकाश दे
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे
तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे
असा दुर्दम्य आशावाद काळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांसमवेत आपल्या तीनही मुलांमध्ये निर्माण केला.
काळे मॅडम यांच्या दोन्ही मुली व एक मुलगा उच्च विद्या विभूषित आहेत. मुलगा निलेश वाल्मिक काळे आय टी कंपनीत पुणे येथे चांगल्या पॅकेजवर नोकरी करत आहे. सूनबाई सौ. शितल निलेश काळे बी. एसी. डी. फार्म, आहे. मुलगी सौ. रोशनी अमित कारके लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन पारोळा येथे कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तर जावाई श्री. अमित विठ्ठल कारके स्टेट बँक ऑफ इंडिया पुणे येथे अधिकारी म्हणून कार्यरत आहे. धाकटी मुलगी सौ. निकीता सचिन पांढरे आंतरराष्ट्रीय भारोत्तलन (वेटलिफ्टिंग) खेळाडू असून, क्रीडा कोट्यातून तिला बँक ऑफ इंडिया पुणे येथे नोकरी मिळाली आहे. तिने जळगाव निंबायती गावाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवले आहे. तर जावाई श्री. सचिन नारायण पांढरे पुणे येथे आय टी. कंपनीत कार्यरत आहेत. असे आदर्श कुटुंब म्हणून पंचक्रोशीत एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. थोडे विषयांतर होईल. पण मला मोह आवरला जात नाही म्हणून निकीताच्या जन्माची कहाणी ‘नकोशी झाली सर्वांची हवी-हवीशी’ थोडक्यात मांडतो. या प्रसंगावरुन काळे मॅडम व सर यांचे पुरोगामी विचार नव्हे, नव्हे तर कृती यातून प्रतिपादित होते.
स्वार्थासाठी व कामापुरते जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात पण विचारांनी व प्रेमाने जवळ जोडलेली माणसे आयुष्यभर सोबत राहतात असे काळे मॅडम यांचे व्यक्तीमत्व आहे. प्रत्येक वेळी सहलीत सक्रिय सहभागी होऊन एकट्या महिला असून त्यांनी सर्व मुलींची जबाबदारी अगदी लिलया पेलली आहे याचे आपण सर्व साक्षीदार आहोत. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कासूताई पाटील, सचिव श्री. महेंद्रनाना पाटील, समन्वयक श्री. निंबाजी शिंदे यांच्या प्रेरणेने, मार्गदर्शनाने काळे मॅडम यांनी तालुक्याच्या शैक्षणिक, राजकीय व सामाजिक पटलावर आपल्या कार्यकुशलतेचा अवीट ठसा उमटविला आहे.
आपण आयुष्यभर कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिकतेने केलेल्या निष्काम सेवेबद्दल आम्हास आपला सार्थ अभिमान आहे. आपणास पुढील आयुष्य आनंदी, निरोगी, आरोग्यदायी व समाधानी जावो, आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्णत्वास जावो, आपल्या कृतीतून समाजाचे व राष्ट्रचे हित जोपासले जावो, परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रभुचरणी प्रार्थना….!
शारीरिक दृष्ट्या दीर्घायुष्य
मानसिक दृष्ट्या शांती समाधान
बौध्दीक दृष्ट्या शंकासमाधान
सामाजिक दृष्ट्या हितकारक सहजीवन
नैतिक दृष्ट्या कर्तव्यकर्म आणि तात्विक दृष्ट्या जन्म मरणावर मात
हे कृतार्थ जीवनाचे दर्शन आहे जे आपल्या व्यक्तिमत्वात आम्हास सदैव दिसते.
आज होतेसे सेवापूर्ती, कर्तव्याची तुमची मूर्ती, आम्ही सारे नक्की घेऊ तुमच्याकडून दिव्य स्फूर्ती II
✍🏻 शब्दांकन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे व समस्त अहिरे परिवार, दाभाडी ता. मालेगाव जि. नाशिक

