
लेखक_प्र.सु.येतावडेकर
मराठी साहित्यात आपल्या पहिल्याच पुस्तकाची दखल रसिक वाचकांना घ्यायला लावणारा… साहित्याच्या प्रांतात ‘मृत्युंजयकार’ हे बिरूद घेऊन दिल्लीच्या तख्तापर्यंत आपल्या मायमराठीची पताका फडकावणारा… राजमान्यता मिळवून रसिक-वाचकांच्या मनावर राज्य करणारा राजा माणूस म्हणजेच… ‘शिवाजी सावंत’!
१९६७ साली ‘मृत्युंजय’ प्रसिद्ध झाली. दैनिक केसरीच्या रविवारच्या पुरवणीत डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे यांनी समीक्षण लिहिले आणि वाचकांच्या या कादंबरीवर उड्या पडल्या. आचार्य अत्रे यांनी देखील त्यांच्या दैनिक मराठा या वृत्तपत्रात अग्रलेख लिहून ‘मृत्युंजय’ची दखल घेतली. ‘मृत्युंजय’मुळे एक अभ्यासू आणि साक्षेपी कादंबरीकार असा नावलौकिक शिवाजी सावंत यांना प्राप्त झाला.
‘मृत्युंजय’ नंतर तब्बल एक तपांनी म्हणजेच १२ वर्षांनी त्यांची ‘छावा’ ही कांदबरी १९७९ साली प्रसिद्ध झाली. ही कादंबरी शिवपुत्र संभाजी महाराज या चरित्रनायकावर होती. आणि त्यानंतर जवळ-जवळ २१ वर्षांचा कालखंड लोटल्यावर. २००० साली श्रीकृष्ण हा चरित्रनायक असलेली ‘युगंधर’ ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली. या त्यांच्या तीनही कादंबर्या आजही तितक्याच प्रसिद्ध आणि वाचकप्रिय आहेत. तसेच अनेक नवनवे विक्रम यांनी प्रस्थापित केलेले आहेत. १९६७ ते २००० या कालखंडाला भारावून टाकून स्वत:च्या प्रेमात टाकणार्या आणि पौराणिक/ ऐतिहासिक असा भव्य कालपट असणार्या या कादंबर्या असल्या तरीही, याच काळात शिवाजी सावंत यांनी साहित्याच्या इतरही क्षेत्रात आपली मुशाफिरी चालू ठेवली होती.
शिवाजी सावंत यांच्या इतर साहित्यप्रकारात स्फुटलेखन, व्यक्तिचित्रे, आणि ‘अशी मने, असे सुमने’, ‘शेलका साज’, ‘कांचनकण’, ‘मोरावळा’ इत्यादी ललित लेखसंग्रहही प्रसिद्ध झाले. सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्यावरील ‘लढत’ ही दोन भागांमधील कादंबरी आणि माथाडी कामगारांचे प्रसिद्ध नेते मनोहर कोतवाल यांच्यावरील ‘संघर्ष’ ही चरित्रात्मक कादंबरी अशा प्रसिद्ध व्यक्तींची दोन चरित्रात्मक कादंबरीचे लेखनही त्यांनी केले.
शिवाजी सावंतांचे ललितलेखन हे त्यांना आलेले अनुभव, भावलेल्या व्यक्ती, त्यांच्याशी असलेले मैत्रीचे घनिष्ठ संबंध यातून सहजपणे स्फुरलेले आहेत, हे आपल्याला त्यांचे ललितलेख आणि व्यक्तिचित्रे वाचत असताना जाणवल्याशिवाय राहत नाही. ज्या माणसांत ते रमले, जे प्रसंग त्यांनी अनुभवले याचा केवळ वैचारिक वेध न घेता, त्याचा आस्वादपर वेध आणि सरळसोपे, मनाला भिडणारे लिखाण यावर त्यांचा भर होता.
आज शिवाजी सावंत यांची जयंती . केवळ मराठी मनावरच नव्हे तर पूर्ण साहित्यविश्वावर आपल्या ‘मृत्युंजयी’ शैलीचा अमिट ठसा उमटवणार्या या राजामाणसालां जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

