अतिशय बिकट परिस्थितीत लहानु माळी यांच्या घरी दि.१४ फेब्रुवारी १९५३ साली गजीराम लहानु पवार या मुलाचा जन्म झाला. शालेय जीवनात अतिशय हुशार असलेले ते पोरगं भविष्यात नाव कमवेल असं सगळ्यांना वाटायचं. आणि झालं ही तसंच, पुढे प्रचंड मेहनतीने आणि जिद्दीने डॉक्टर झालेल्या त्या मुलाला लोक डॉ.जी.एल.पवार नावाने ओळखु लागले
धाडसी निर्णय घेणार बेधडक नाव म्हणजे डॉ.जी. एल. पवार. मनेगावच्या आणि धोंडविरनगरच्या रुग्णांसाठी हक्काचा आणि अभिमानाचे नाव म्हणजे डॉ.जी. एल. पवार.डॉक्टर पेशातल साहशी आणि तेजतर्रार नाव म्हणजे डॉ.जी.एल.पवार. एक कर्तव्यनिष्ठ आणि ध्येयनिष्ठ डॉक्टर म्हणजे डॉ.जी.एल.पवार. वैद्यकीय क्षेत्रात काम करुन राजकारणाचे आणि समाजकारणाचे काम मोठ्या ताकतीन उभे करणारा प्रामाणिक नेता म्हणजे डॉ. जी. एल. पवार. गजीराम लहानु पवार यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण हे धोंडवीरनगर नगर येथे झाले. नंतर मनेगावात पाचवीपासून ते आठवीपर्यंत शाळा होती म्हणून मनेगाव येथे पाचवीसावठी शाळेत जावे लागले. तेथे पाचवीच्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर श्रीराम शिंदे, शांताराम जमदाडे, नामदेव शिंदे, चांगदेव लावरे असे अनेक विद्यार्थी त्यांचे चांगले मित्र होते. डॉ.जी. एल. पवार यांचे सातवीपर्यंत शिक्षण मनेगावच्या प्राथमिक शाळेत झाले. पुढील शिक्षणासाठी सिन्नरला जाणे हे क्रमप्राप्त होते. कारण मनेगाव मध्ये तोपर्यंत सातवी पर्यंत शाळा होती. परंतु त्याच दरम्यान मनेगाव मध्ये केरू सहादू सोनवणे, भाऊराव मामा शिंदे, आहेर गुरुजी, हरि विष्णू सोनवणे, रामनाथ परदेशी काका यांच्या पुढाकाराने मराठा विद्या प्रसारक समाजाचे हायस्कूल सुरू करण्यात आले होते.शाळेत पट वाढवण्याची जबाबदारी ही गावातील याच पंचमंडळीकडे होती. म्हणून या सर्वांनी मनेगावच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी बाहेर पाठवण्यास विरोध केला, व तो पट नवीन शाळेकडे वळवला. गावाच्या विकासासाठी आणि या पंचमंडळींच्या शब्दाला मान देऊन एकही विद्यार्थी गावातून बाहेर शाळेत गेला नाही. शाळेला पट वाढवण्याची गरज होती म्हणून गावातल्या प्राथमिक शाळेने मुलांची दाखले बाहेर सिन्नरच्या शाळेला जाण्यासाठी दिले नाही. त्यामध्ये इच्छा असूनही डॉ.जी. एल. पवार यांना सिन्नरला शिक्षणाला जाता आले नाही. त्यांना सातवी नंतर सिन्नरला जाण्याची खूप इच्छा होती.त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण मनेगाव येथे झाले.शाळेत रोज येण्यासाठी पायी प्रवास करावा लागणार होता. कारण सायकल घेण्या इतकी ऐपत ही डॉक्टरांच्या घरची नव्हती. नूतन जवाहर विद्यालयाचा आठवीचा वर्ग म्हणजे डॉक्टर साहेब आणि श्रीराम शिंदे यांची ती पहिलीच तुकडी. त्यावेळी सातवी आणि अकरावीला केंद्र परीक्षा होत्या. त्या पास झाल्या की मग पुढे उच्चशिक्षणाला प्रवेश मिळत असे. त्यांनी आठवी ते अकरावी शिक्षण सिन्नर येथे पूर्ण केले . व पुढे डॉ.जी.एल.पवार यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी पाच वर्षा करता नागपूरला गाठले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सिन्नर येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. तसं बघितलं तर डॉक्टर जी एल पवार हे मनेगावातील पहिले डॉक्टर. त्यांच्या व्यवसायाचा सुरुवातीचा काळ हा अतिशय कठीण होता पण त्याही परिस्थितीवर त्यांनी मात केली.सुरवातीच्या काळात सायकलवरच प्रवास करावा लागला.मनेगाव व पंचक्रोशीत आपल्या वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी येत असत. मनेगावच्या लोकांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला होता. हे सर्व करत असताना त्यांनी सिन्नर येथे स्वतःचे हॉस्पिटल बांधण्याचा निर्णय घेतला आणि तो पूर्णही केला. आणि मग उभे राहिले सिन्नर येथील तालुक्यातील पहिले सुसज्ज हॉस्पिटल. "पवार जनरल हॉस्पिटल" इथूनच मग त्यांनी रुग्ण सेवा करण्यास सुरुवात केली. गावातील अनेक लोक घरचा डॉक्टर या नात्याने त्यांच्याकडे जात व घरच्याच नात्याने ते पेशंट वर इलाज करत. गरिबीची आणि गावातील लोकांच्या परिस्थितीची जाण असल्यामुळे त्यांनी गावातील लोकांना कधीही पैशासाठी तगादा लावला नाही. सहा - सहा महिने, वर्ष - वर्ष लोकांनी डॉक्टर साहेबांची फी रोखून धरायचे तरीही डॉक्टर साहेबांनी कधी इलाज करण्याचे थांबवले नाही. मी डॉक्टर आहे तो फक्त पैसे कमवण्यासाठी नाही. डॉक्टर हे माझे सेवेचे पद आहे, आणि त्या पदाला मी न्याय देईल असेच ते नेहमी म्हणायचे. पेशंटला त्यांची हाताळण्याची पद्धत, त्यांच्यातील धाडसी आणि साहसी वृत्ती यामुळे त्यांचे हॉस्पिटल अल्पावधीत सिन्नरचे प्रसिद्ध हॉस्पिटल बनले. डॉ.जी.एल. पवार हे नाव तालुक्यामध्ये मोठ्या आदराने घेतले जाऊ लागले. वैद्यकीय व्यवसायामध्ये जम बसल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला. पुढे राजकारणाची संधी मिळाली. व ते भाजप पक्षाचे सक्रिय सभासद झाले. अटल बिहारी वाजपेयी, पंडित दीनदयाळ, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ते पक्षवाढी बरोबरच सामाजिक कामही तळमळीने करू लागले. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे व प्रमोदजी महाजन यांच्याशी त्यांचे अतिशय निकटचे संबंध होते. नाशिक मध्ये भाजपाचा कुठलाही कार्यक्रम किंवा सभा असेल तर डॉ.जी. एल. पवार हे नाव मोठे आदराने घेतले जात.त्यांनी भाजपकडून पंचायत समितीची निवडणूक ही दोन-तीन वेळा भाजपच्या कमळ या निशाणीवर लढवली. आणि अवघ्या काहीशा मतानेच त्यांचा पराभव झाला. पण या मार्गाने मनेगाव येथील सामाजिक प्रश्न सोडविता आले. एक काळ असा झाला होता की सिन्नर भाजप म्हणजे डॉक्टर जी एल पवार. आणि जी एल पवार म्हणजे सिन्नर भाजप.धोंडवीरनगर येथे सुरळीत आणि नियमित वीज पुरवठा करण्यातही डॉ .साहेबांचा मोठा हात. धोंडविरनगरला टेलिफोन कनेक्शन नव्हते, टेलीफोन कनेक्शनसाठी वारंवार भारतीय दूरसंचार निगम यांच्याशी संपर्क साधून आणि पत्र व्यवहार करून टेलिफोनची लाईन धोंडविरनगर मध्ये आणली. सिन्नर धोंडवीरनगर हा रस्ता अतिशय खड्ड्यांचा आणि जीवघेणा होता. त्यांच्याच पुढाकाराने हा रस्ता डांबरीकरण झाला आणि गावाचं कनेक्शन तालुक्याच्या गावाशी चांगल्या रीतीने जोडले गेले. आणि पुढे दळणवळणासाठी त्या रस्त्याचा गावातील लोकांना खूप मोठा फायदा झाला. धोंडवीरनगर येथे पाझर तलावांची निर्मिती करून दुष्काळी गावच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी बऱ्यापैकी सोडवला. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर हा एकमेव पर्याय होता त्यावर उपाय म्हणून त्यांनी पिण्याच्या पाण्या साठी बोअरवेल घेऊन पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला थोडाफार हातभार लावला, अशी अनेक कामे त्यांनी गावात केली. धोंडवीरनगर ग्रामपंचायत स्वतंत्र स्थापन करणे ही डॉक्टर जी. एल. पवार यांची संकल्पना. एकत्रित ग्रामपंचायत मध्ये गावाचा विकास खुंटला होता आणि त्यामुळे मनेगाव मधून वेगळे होऊन स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले व ते यशस्वी झाले. नवीन धोंडविरनगर ग्रामपंचायत झाल्याने गावच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली . तरीही त्यांना गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न स्वस्त बसू देत नव्हता.पिण्याच्या पाण्यासाठी तात्कालिक ग्रामविकास मंत्री आर आर पाटील यांच्या कडून निधी आणून माळावर पाण्याची टाकी बांधली.पण काही तांत्रिक कारणामुळे ती अर्धवट राहिल्याने जनतेला त्याचा काहीच फायदा झाला नाही.आजही डॉक्टर साहेबांना जे जे शक्य आहे ते ते गावासाठी करण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. त्यांनी आपला मित्रपरिवार आणि भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सिन्नर शहरात पंडित दीनदयाल नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. व गोरगरीब आणि अडचणीत असलेल्या लोकांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा केली आणि अनेकांचे संसार थाटले. धोंडविनगरच्या खुटलेल्या विकासाला गती देण्यासाठी त्यांनी स्थानिक जनतेच्या मागणीनुसार श्री संत सावतामाळी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था सुरू केली. त्यातून गावच्या विकासाला बऱ्यापैकी गती मिळाली. आणि आणि होतकरू तरुणांनी व्यवसाय उभे केले, याचे सगळे श्रेय डॉ. जी एल पवार यांना जाते. जातीय राजकारणामुळे त्यांना गावात व तालुक्यात राजकारणातून काम करण्याची फारशी संधी मिळाली नाही. तरीही त्यांनी आपल्या सामाजिक कार्याची कास सोडली नाही, व ते जिथे शक्य असेल तिथे शेतकरी , गोरगरीब लोकांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. पुढे त्यांनी आईच्या नावाने सावित्रीबाई पवार हायस्कूल सुरू केले. त्यातून आजही ज्ञानदानाचे काम सुरू आहे. अनेक गोरगरीब व सामान्य घरचे विद्यार्थी त्यात शिक्षण घेत आहेत. वादळांशी दोन हात करून मार्ग काढणारा वाटाड्या म्हणजे डॉ. जी. एल. पवार. अतिशय धाडसी, साहसी, कर्तव्यनिष्ठ, समाजनिष्ठ वैद्यकीय क्षेत्रातील नाव म्हणजे डॉ. जी. एल. पवार. सिन्नर तालुक्यातील प्रामाणिक एकनिष्ठ आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणजे डॉ.जी. एल. पवार. लोकांसाठी झटणारा लोकाभिमुख लोकनेता म्हणजे डॉ. जी. एल. पवार. सर्वांना सोबत घेऊन चालणारा आणि एकतेचा संदेश देणारा मनमिळावू हळव्या मनाचा माणूस म्हणजे डॉ. जी. एल. पवार. वाचकहो डॉ. अशोक सोनवणे यांची खूप इच्छा होती की त्यांचे वैद्यकीय सहकारी मित्र डॉ. जी. एल. पवार यांच्या जीवनाचा उलगडा व्हावा. डिग्री घेऊन डॉक्टर होता येत, पण डिग्री बरोबरच प्रचंड साहस आणि धाडस घेऊन आलेले डॉ. जी. एल. पवार यांची गोष्ट काही औरच आहे. आपलाच नवनाथ मारुती सोनवणे