
लेखक:- सुहास कारभारी खाडे,
मु.पो.जाखोरी
ता.जि.नाशिक
75072 62040

माझे जाखोरी गाव नाशिक शहरापासून अवघ्या बारा-तेरा किलोमीटरवर, तालुक्याच्या पूर्व भागात दारणा नदीच्या काठावर वसलेले आहे. आज हे अंतर अगदी जवळचे वाटते; पण आमच्या लहानपणी शहर आणि गाव यांच्यात केवळ किलोमीटरचे नव्हे, तर सुविधांचेही मोठे अंतर होते. वाहतुकीची साधने नव्हती. रात्री मुक्कामाला येणारी एक बस म्हणजे गावाला बाहेरच्या जगाशी जोडणारा धागाच होता.
मला साधारण १९९१-९२ पासूनचा बैलपोळा आजही लख्ख आठवतो. पोळा जवळ आला की आठ-दहा दिवस आधीपासूनच घरात लगबग सुरू व्हायची. आजोबा किंवा वडील बैलांसाठी लागणारे सजावटीचे साहित्य आणण्यासाठी नाशिक शहरात किंवा सिन्नर ह्या ठिकाणी जायचे. नवीन वेसणी, घुंगरमाळा, गोंडे, रंग, बेगड, शिंगांसाठी फुगे—या वस्तू घरी आल्या की आम्हा लहान मुलांसाठी जणू पोळा त्याच दिवशी सुरू व्हायचा.
आई आणि आजी काही दिवस अगोदरच मातीचे बैल घरी आणायच्या. त्यांची पूजा होत असे. घरातील या छोट्या मातीच्या बैलांपासून गोठ्यातील खऱ्या सर्जा-राजापर्यंत संपूर्ण वातावरण कृतज्ञतेने भारावलेले असायचे.
पोळ्याच्या आदल्या दिवशी वर्षभर जू वाहणाऱ्या बैलांच्या खांद्यांना हळद-तूप लावून प्रेमाने मळले जाई. या प्रथेला ‘ खांदेमळणी ’ म्हणतात. ज्या खांद्यांनी शेतकऱ्याच्या संसाराचा भार वाहिला, त्या खांद्यांवरून कृतज्ञतेचा हात फिरविण्याचा तो दिवस असे.
पोळ्याच्या दिवशी दुपारी आम्ही बैलांना दारणा नदीवर घेऊन जायचो. नदीच्या पाण्यात त्यांना मनसोक्त अंघोळ घालायचो. त्यांच्या अंगावरील माती धुतली जात असताना आमच्या आनंदालाही जणू नवे तेज यायचे. अंघोळीनंतर बैलांच्या अंगावर रंगात बुडवलेल्या हातांचे ठसे उमटवले जात. कुणी शुभचिन्हे काढत असे, तर कुणी बैलाचे नावच अंगावर रंगवत असे. अंगावर घोंगडी किंवा आकर्षक झूल, गळ्यात घुंगरमाळा, कपाळावर कुंकवाचा टिळा आणि रंगविलेल्या शिंगांना फुगे बांधले की आपलीच बैलजोडी गावात सर्वांत देखणी दिसावी, असे प्रत्येक शेतकऱ्याला वाटायचे. आमच्या बैलजोडीचे नाव हौश्या व पैंजण्या असे होते …
दुपारनंतर संध्याकाळी चार पाचच्या वेळेस शेतांमधून आणि मळ्यांमधून गावाकडे येणाऱ्या सजवलेल्या बैलजोड्यांची जणू रीघच लागत असे. प्रत्येक शेतकरी आपल्या सर्जा-राजाला मोठ्या अभिमानाने सजवून-धजवून गावात आणायचा. लहान मुलेही आपापल्या आवडत्या छोट्या वासरांना घेऊन भाऊ, वडील किंवा आजोबांसोबत मोठ्या उत्साहाने मिरवणुकीत सहभागी व्हायची. एखाद्याची बैलजोडी विशेष देखणी सजवलेली असली, तर तिच्याभोवती कुतूहलाने गर्दी जमायची. शिंगांचा रंग, अंगावरील नक्षी, गळ्यातील घुंगरमाळा आणि पाठीवरील झूल यांचे कौतुक व्हायचे. दिवसभर त्या बैलजोडीची गावभर चर्चा रंगायची. त्या काळी बैलांची सजावट ही केवळ हौस नव्हती; ती शेतकऱ्याच्या कष्टाची, प्रेमाची आणि आपल्या सर्जा-राजाविषयी असलेल्या अभिमानाची सार्वजनिक अभिव्यक्ती होती.
सजविलेल्या बैलांना गावात आणल्यानंतर सर्वप्रथम मसरीम बाबांचे दर्शन घेतले जाई. त्यानंतर हनुमान मंदिरात दर्शन घेऊन बैलांची गावातील गल्ल्यांमधून मिरवणूक निघायची. घुंगरांचा मंजुळ नाद, मुलांचा गोंधळ, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील अभिमान आणि सजलेल्या बैलांची रुबाबदार चाल—अवघे जाखोरी गाव त्या आनंदात न्हाऊन निघायचे.
त्या मिरवणुकीत थोडी धावपळ आणि गंमतही असायची. कधी एखादा बैल अचानक उधळायचा आणि गर्दीची तारांबळ उडायची. आम्ही लहान मुले बैलांच्या शिंगांना बांधलेले फुगे फोडण्यासाठी त्यांच्या मागे धावायचो. मोठी माणसे रागवत असली, तरी आमच्यासाठी फुगा फोडणे म्हणजे त्या दिवसातील मोठा पराक्रमच होता!
त्या काळी गावातील जवळजवळ प्रत्येक घरात माणसे राहत होती. प्रत्येक गल्ली जागी होती. घरासमोर उभ्या असलेल्या आजी-आजोबांपासून दारात जमलेल्या लहान मुलांपर्यंत सारेच मिरवणुकीची वाट पाहत असत. सजलेली बैलजोडी प्रत्येक दारासमोरून जाताना त्या घराच्या आनंदात आपला वाटा ठेवून पुढे निघत असे.
आज गाव आहे, गल्ल्या आहेत आणि पोळाही आहे; पण अनेक घरांचे दरवाजे बंद झाले आहेत. कुणी शेतातील मळ्यात राहायला गेले, तर कुणी रोजगारासाठी शहराची वाट धरली. पूर्वी माणसांनी भरलेल्या गल्ल्यांमधून आता काही तुरळक बैलजोड्या जातात; मात्र तिच्याकडे कौतुकाने पाहणारे काही परिचित चेहरे हरवले आहेत. आणि आता तर बैलांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकी झाली आहे आणि त्यांच्या गळ्यातील घुंगरांचा नादही आता तर ऐकायलाच मिळत नाही..
मिरवणुकीनंतर बैल घरी आले की त्यांची विधिवत पूजा केली जायची. आई-आजीने केलेल्या चुलीवरचा पुरणपोळीचा आणि आमटीचा सुगंध संपूर्ण घरात दरवळत असे. बैलाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविल्याशिवाय घरातील पंगत सुरू होत नसे. त्या पुरणपोळीत गुळाची गोडी होतीच; पण वर्षभर साथ देणाऱ्या मुक्या जिवाबद्दलची कृतज्ञताही मिसळलेली होती. माझा तर पूर्णपोळीचा स्वयंपाक सर्वात आवडता होता आणि आजही आहे…
बैलपोळा हा केवळ पशुपूजेचा सण नव्हता. तो शेतकरी आणि बैल यांच्यातील जिवाभावाच्या नात्याचा उत्सव होता. वर्षभर ज्याच्या खांद्यावर जू ठेवले, त्याच खांद्याची वर्षातून एकदा पूजा करण्याइतकी कृतज्ञ आपली कृषिसंस्कृती होती.
काळ बदलला. बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली, घोंगडीची जागा आकर्षक झुलींनी आणि घुंगरांच्या नादाची जागा मोठ्या ध्वनिक्षेपकांनी घेतली. बदल अपरिहार्य आहेत; परंतु त्या उत्सवामागची माया आणि कृतज्ञता हरवता कामा नये.
आजही बैलपोळा आला की मन पुन्हा त्या जुन्या जाखोरीत जाऊन पोहोचते—आजोबांनी व वडिलांनी शहरातून आणलेले सजावटीचे साहित्य, आई-आजीचे मातीचे बैल, दारणेतील अंघोळ, शिंगांवरील फुगे, घुंगरांनी दुमदुमलेल्या गल्ल्या , मळ्यांमधून बैलांच्या टापांचा येणारा आवाज आणि पुरणाच्या स्वयंपाकाने भरलेले घर…
आता बैलपोळा दरवर्षी येतो; पण बालपणीचा तो पोळा पुन्हा येत नाही.
कदाचित सण कधीच जुने होत नसतात—त्यांना साजरे करणारी माणसे, भरलेली घरे आणि आनंदाने गजबजलेल्या गल्ल्या हळूहळू आठवणीत जातात. म्हणून आजही जाखोरी नदीच्या पुलावरून दारणा नदीचे पाणी वाहताना दिसले की असे वाटते—त्या प्रवाहात आमच्या बालपणीच्या बैलपोळ्याचे रंग, घुंगरांचे स्वर आणि गावपणाची थोडीशी माया अजूनही वाहत असावी…
बैलांच्या अंगावरील रंग पाण्याने निघून गेले; पण आमच्या मनावर उमटलेले त्या पोळ्याचे ठसे आजही पुसले गेलेले नाहीत.

