
सोनांबे (ता. सिन्नर) : येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरात टी.एस.पी. म्हाडा २०२४-२५ योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सांस्कृतिक भवनाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. गावातील विविध वारकरी व भजनी मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले, हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या विशेष प्रयत्नातून या सांस्कृतिक भवनाचे काम मार्गी लागले आहे. गावातील ज्येष्ठ वारकरी रामभारती गोसावी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. विठ्ठल मंदिरात वारकरी, भजन, कीर्तन तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र सांस्कृतिक भवनाची आवश्यकता अनेक दिवसांपासून जाणवत होती. त्यामुळे हे काम मंजूर होऊन प्रत्यक्षात सुरू झाल्याने वारकरी व ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या कामासाठी २९ लाख ९९ हजार ९६८ रुपयांची निविदा स्वीकृत करण्यात आली असून, कार्यादेश मंजूर झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीत बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जेष्ठ ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनीही या कामासाठी सातत्याने विशेष पाठपुरावा केला होता.
भूमिपूजन प्रसंगी भाऊसाहेब पवार, रमेश सूर्यवंशी, सुदाम घोडे, मच्छिंद्र डगळे, शंकर उगले, शिवाजी शिंदे, बाळकृष्ण पवार, सुदाम नवले, हरिचंद्र सातपुते, वसंत बेंडकुळे, प्रसाद रत्नाकर, रामकृष्ण पवार, रामनाथ पवार, रविंद्र पवार, नामदेव पवार, कृष्णा सूर्यवंशी, निवृत्ती पवार, शिवाजी पवार, पंढरी पवार, तानाजी जाधव, तानाजी पवार, सुखदेव बोडके, बबन पवार, विष्णू पवार, पाटील, जगताप, राजू पठाण यांच्यासह वारकरी, भजनी मंडळांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
विठ्ठल मंदिराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला अधिक व्यापक व्यासपीठ मिळणार असून, या भवनामुळे गावातील भजन, कीर्तन, प्रवचन, वारकरी मेळावे तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सांस्कृतिक भवनाचे काम लवकरात लवकर दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

