
नांदगाव 🙁 प्रतिनिधी ) नांदगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली असून, या प्रकरणात अंधश्रद्धायुक्त बाबींचा आधार तर घेतला गेला नाही ना, अशी शंका महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केली असून तशा आशयाचे विनंती पत्र नांदगाव पोलिसात संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.

पत्रात म्हटले आहे की, मुलीच्या अपहरणा मागे अंधश्रद्धायुक्त तोडग्यांचा अनिष्ट, अघोरी प्रकार केला असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या तपासाची दिशा अंधश्रद्धांच्या विविध प्रकाराच्या शक्यता लक्षात घेऊन त्याप्रमाणे तपास करावा अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.
अंधश्रद्धेच्या नावाखाली कोणाकडूनही फसवणूक अथवा दिशाभूल केली जात असल्यास त्याची चौकशी करून संबंधितांवर जादूटोणा विरोधी कायदा तसेच इतर आवश्यक कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे तसेच नांदगाव शाखेचे सचिव प्रा. सुरेश नारायणे यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन देण्यात आले आहे. पोलिसांनी या गंभीर प्रकरणाचा तातडीने तपास करून बालिकेचा सुरक्षित शोध घ्यावा, अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली आहे.

