
जळगाव (वार्ताहर) ‘कॅच द रेन’, जळगाव महानगरपालिकेच्या ‘वॉटरथॉन’ संकल्पनेतून प्रेरणा घेऊन हिरवांकुर फाउंडेशन नाशिक, ग्रीन सिटी फाउंडेशन जळगाव व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जलम् रक्षति रक्षितः या विषयावर सेमिनार घेण्यात आले.

जल म्हणजे ईश्वराने आपल्या दारात लाखो लिटर निःशुल्क पोहोचवले अमृत आहे. मात्र आपल्याला त्याची किंमत कळत नाही. नाशिकमध्ये ४६ जल मंदिरांची निर्मिती करण्यात आलेली आहे. एका जल मंदिरात कमीत कमी ३ ते १० लाख लिटर पाणी जमा होते. पर्यावरणाचे रक्षण प्रबोधन व जनजागृतीबरोबर विद्यार्थी दशेतून हरित संस्कारातून होणे आवश्यक आहे. जर विद्यार्थी दशेतच हातात फावडे, मनात वृक्ष आणि डोळ्यात पाणी वाचवण्याची दृष्टी आली, तर विद्यार्थी उद्याचा जबाबदार नागरिक होईल. असे प्रतिपादन नाशिक हिरवांकुर फाउंडेशनचे प्रमुख निलयबाबु शाह जैन यांनी केले.
अध्यक्षस्थानी नूतन मराठा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील होते. अतिथी म्हणून ग्रीनसिटी फाउंडेशनचे प्रधान सेवक विजय वाणी होते. समवेत डॉ. एम. एस. पाटील, एनसीसीचे लेफ्ट. शिवराज पाटील, एनसीसी महिला प्रमुख सौ. वानखेडे,नलिनी शाह जैन, राखी शाह जैन, वेलिना शाह जैन सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
जागतिक ओझोन दिनाचे औचित्य साधून भूगोल विभागातर्फे पोस्टर स्पर्धा घेण्यात आली त्यात प्रथम पारितोषिक वैभव पाटील, द्वितीय अंजली राठोड, तर तृतीय गोविंदा चव्हाण व विवेक सोळंके यांनी पटकावले. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार प्रा. आकाश हिरे यांनी मानलेत.

