
लासलगाव ( प्रतिनिधी ) : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘विद्यार्थिनी मंच’चा उद्घाटन समारंभ मंगळवार, दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटक व प्रमुख व्याख्यात्या म्हणून ॲड. विजया जगताप उपस्थित होत्या. ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, “भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य, शोषणाविरुद्ध हक्क आणि धर्मस्वातंत्र्य दिलेले आहे. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा महिलांना कौटुंबिक व शारीरिक हिंसाचारापासून पूर्ण संरक्षण मिळवून देतो.” या वेळी त्यांनी महिलांचे हक्क, कायदेविषयक जागृती, शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन या मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. महिलांनी स्वतःच्या हक्कांची जाणीव ठेवून आत्मविश्वासाने प्रत्येक क्षेत्रात पुढे आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. भूषण हिरे होते. त्यांनी दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणे देत महिला सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले व विद्यार्थिनींना प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. उषा आहिरे यांनी केले. या प्रसंगी विद्यार्थिनी मंचच्या सहकारी डॉ. उज्ज्वला शेळके यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. प्रतीक्षा काळे यांनी विशेष सहकार्य केले.
या सोहळ्यास महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी जगताप हिने केले, तर आभार कु. महिमा अहिरे हिने मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. उषा आहिरे, डॉ. उज्ज्वला शेळके, प्रा. प्रतीक्षा काळे यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

