
नाशिक (प्रतिनिधी ) सोमवार दिनांक १३/७/२०२६ रोजी सायंकाळी ‘माझा जीवन प्रवास’ या विषयावर कवी व गझलकार काशिनाथ महाजन यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
नाशिक मधील सगळ्यात जुने असे महिला मंडळ म्हणजे तिडके कॉलोनी मधील स्त्री मंडळ जे यंदा आपल्या स्थापनेची नव्वद वर्ष पूर्ण करत आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे 1932 साली त्या काळच्या घरंदाज , उत्साही आणि आपल्या अस्तित्वाविषयी जागरूक असणाऱ्या स्त्रियांनी एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली आणि नाशिकमधल्या त्यांच्यासारख्या कुटुंबवत्सल स्त्रियांसाठी एक हक्काचा कट्टा उपलब्ध झाला. यंदा हे मंडळ आपल्या दीडशे सभासद सख्यांच्या सोबतीने 94 वर्षात दमदार पाऊल टाकत आहे.
स्त्री मंडळाचे अध्यक्ष – नीलिमा जोशी यांनी हे व्याख्यान आयोजित केले होते. उपाध्यक्ष – हेमा दशपुत्रे यांच्यासह मोठ्या संख्येने मंडळाचे सदस्य व इतर प्रेक्षक उपस्थित होते. प्रवेश दारासमोर रेखाटलेल्या समर्पक रांगोळीने सर्वांचे मन वेधून घेतले. प्रास्ताविक आणि काशिनाथ महाजन यांचा परिचय सोनल राणे यांनी करून दिला.
अत्यंत बिकट व हलाकीची परिस्थिती असताना काशिनाथ महाजन यांना वयाच्या बाराव्या वर्षी अंधत्व आले तरीही उच्च शिक्षित, अधिक्षक, सुपरिचीत कवी, गझलकार, आत्मचरित्रकार, अनेक पुरस्कारांनी सन्मानित, सकारात्मक व्यक्तीमत्व होण्यासाठी किती संकटांना सामोरे जावे लागले याविषयीचा जीवन प्रवास काशिनाथ महाजन यांनी शब्दरूपात चित्रीत केला. त्यांच्या आयुष्यात व यशात नाशिक येथील शासकीय विद्या निकेतन, त्यांची पत्नी सौ. रेखा महाजन, व विशेषतः नाशिककरांचा सिंहाचा वाटा आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. अधून मधून काव्यपंक्तींची पेरणी ही केली.
‘काही असे करू की, विपवू अखिल विश्व
म्हणतील अंध असुनी, झाला प्रकाश पर्व ‘
‘अंध जीवाच्या अंधारी
नाही बिशाद सूर्याची
तेथे उजेड दाखवी
ज्योत मानवी स्नेहाची’
अशा स्वरचित काव्यपंक्तींनी भाषण अधिक रंगतदार झाले
कार्यक्रमाची सांगता भाग्यश्री जोशी यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.
काशिनाथ महाजन, नाशिक

