
जळगाव निंबायती – करिअर मार्गदर्शन मेळावा
जळगाव निंबायती (वार्ताहर) योग्य करिअरची निवड हा केवळ निर्णय नसून आयुष्यभराचा यशाचा मार्ग ठरतो. स्वतःला ओळखा, आपल्या क्षमता ओळखा, माहिती मिळवा, आणि योग्यवेळी शिक्षकांचा सल्ला घेऊन निर्णय घ्या. विद्यार्थीदशेतील योग्य करिअर निवड भविष्यातील यशाची गुरुकिल्ली ठरते असे प्रतिपादन सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक सुनिल नंदवाळकर यांनी केले, ते येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे गो. य. पाटील विद्यालय, रोडूआण्णा गोविंदराव पाटील कला वाणिज्य व विज्ञान वरीष्ठ महाविद्यालय आणि फिनिक्स करिअर अकॅडमी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करिअर मार्गदर्शन मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव महेंद्र पाटील होते.
विद्यार्थीदशेतच आपली बलस्थाने व बौद्धिक क्षमता ओळखा, राज्यशासनात १८३ व केंद्र शासनात १८८ हून अधिक सेवाक्षेत्रे आहेत त्यांची माहिती मिळवा, मोबाईल व सोशल मीडियाच्या आहारी न जाता नाविन्यपूर्ण पुस्तकांचे अधिकाधिक वाचन करावे असे आवाहन नंदवाळकर यांनी केले. यावेळी सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांनी मार्गदर्शन केले. समवेत संस्थेचे विश्वस्त भिलाजी दुकळे, समन्वयक निंबाजी शिंदे, मुख्याध्यापक व्ही. डी. काळे, प्राचार्य सद्दाम अन्सारी, पर्यवेक्षक डी. के. जगताप, प्रा. एस. टी. जाधव सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्तविक प्रा. अमोल अहिरे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. पी. बी. देवरे यांनी केले तर आभार प्रा. पी. यु. शिंदे यांनी मानलेत.

करिअरच्या ठरलेल्या परंपरागत वाटांसोबतच वेगळ्या चाकोरी मोडणाऱ्या नवीन वाटांची ओळख या मेळाव्यातून विद्यार्थ्यांना झाली. आपली आवड व क्षमता या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन करिअरची योग्य निवड कशी करावी? करिअरच्या अवघड टप्प्यांवर कोणत्या गोष्टींचा विचार करावा? कमी गुणांतील करिअरचे विविध पर्याय कोणते? या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्याला युवक-युवतींचा उदंड प्रतिसाद मिळाला.

