
नाशिकरोड:- येथील शिखरेवाडीतील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सभागृहात संस्थेचे सचिव अविनाश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सभासदांसाठी सुलभ योगाभ्यासाच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले.
योगाभ्यासाला प्रारंभ करण्यापूर्वी ज्येष्ठांनी घ्यावयाच्या काळजी बद्दलचे सविस्तर विवेचन योगशिक्षक अविनाश गोसावी यांनी केले. ॐकार आणि गुरुवंदना झाल्यानंतर योगाभ्यासापूर्वी पूरक हालचालींचे महत्त्व, मन आणि शरीर यांचे संतुलन राखत योग्य रीतीने
हालचाली कशा कराव्यात, यांची प्रात्यक्षिके योगशिक्षिका सुनंदा गोसावी यांनी उपस्थितांना करून दाखविली. सर्व ज्येष्ठांनी मार्गदर्शनाचा आधार घेत हालचाली करत स्वानुभव घेतला. पूरक हालचाली करत असताना वाढलेला श्वसनाचा वेग आणि वाढलेले हृदयाचे ठोके यांसह मनाला विश्रांती मिळण्यासाठी योगनिद्रेचा सराव योगशिक्षक अविनाश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठांनी केला. योगनिद्रेच्या अभ्यासानंतर शांत झालेले मन आणि हृदयासाठी दीर्घ श्वसनसरावाच्या स्वानुभवासह एकादश ॐकार उच्चारण आणि अतीव शांततेचा अनुभव सर्व उपस्थितांनी घेतला. उपाध्यक्षा सुनंदा गोसावी यांनी प्रात्यक्षिकांसह उपस्थितांना योग्य रीतीने हालचाली कशा कराव्यात, यासंबंधीचे बहुमोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी खजिनदार शरद वैद्य, उपखजिनदार परमेश्वर चिंतकिंदी, अनिल बोकील, अरुण देशपांडे, अविनाश कुलकर्णी, अनिल सहस्त्रबुद्धे, रवींद्र चंद्रात्रे, संजीव हजिरनीस, गजानन वाघमारे, दत्तात्रय पाटील, प्रकाश भालेराव,ज्योती वाघमारे, ज्योती जोशी, सुधा डमरे, वैजयंती चंद्रात्रे, सुप्रिया बनसोड, मनीषा जोशी, रेखा नाशिककर, वीणा जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले. सुनंदा गोसावी यांनी अध्यक्षीय भाषणात नियमितपणे केलेल्या योगाभ्यासाचे महत्त्व आधोरेखीत करत स्वानुभव उपस्थितांना सांगितले. दत्तात्रय पाटील यांनी निवेदन करत आभार प्रदर्शन केले.

