
नाशिक (प्रतिनिधी) : विश्वास ग्रुप व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा जलालपूर, नाशिकतर्फे चित्रपट प्रेमींसाठी ‘सिनेमा कट्टा’ उपक्रमांतर्गत ,शुक्रवार 14 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता लिटल बॉय हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अॅलेक्हांद्रो माँतेवेर्दे आहेत
सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास गार्डन शेजारी), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील ओहेअर गावात राहतोय पेप्पर. एक आठ वर्षांचा मुलगा. तो ठेंगणा आहे. त्याची उंची काही केल्या वाढत नाहीय. सव्वातीन फुटावर ती थांबलीय. त्यामुळे त्याला कोणी मित्रच नाहीयत. खूप वर्षांनी मोठा असलेला मोठा भाऊ गबरू जवान आहे. पेप्परचा एकमेव मित्र, पार्टनर आहे त्याचा बाबा. तो आणि बाबा मिळून एक अर्धस्वप्नातलं रोमांचक जग तयार करतात आणि त्यात रमतात. जादूगार बेन ईगलचे दोघे चाहते आहेत. पण दिवस वाईट आहेत. पर्ल हार्बरनंतर अमेरिका प्रत्यक्ष युद्धात ओढली गेलीय. आणि बाबाला युद्धावर जावं लागतं.
निराश पेप्परला काहीही करून बाबाला परत आणायचंय. त्यासाठी तो काहीही करायला तयार आहे. तशात जादूगार बेन ईगलचा कार्यक्रम त्यांच्या गावी होतो आणि त्यात पेप्पर चक्क हात न लावता दुरून एक बाटली हलवतो. त्याला विश्वास वाटू लागतो की आपल्यात काहीतरी शक्ती आहे आणि ती वापरून आपण बाबाला परत आणू शकू. तिथल्या चर्चचे फादर ऑलिव्हर त्याला सांगतात की त्याने जर एक प्राचीन यादीतील कामे पूर्ण केली तर कदाचित ते शक्य होईल. पण त्यात ते एक मेख मारून ठेवतात. ते त्या यादीत भर घालतात आणि सांगतात की त्यांने हाशिमोटोशी दोस्ती केली पाहिजे. गावापासून जरा लांब एकटाच राहणारा हाशिमोटो आहे जपानी वंशाचा. तेच जपान ज्याच्याशी अमेरिकेचे युद्ध चालू आहे. ज्या जपान्यांचा उल्लेख केवळ तिरस्काराने केला जातो ते जपानी.
पेप्पर आणि हाशिमोटो यांची दोस्ती होते का? ती दोस्ती गाव, पेप्परचा भाऊ खपवून घेतात का? पेप्परच्या अंगी खरेच काही शक्ती असते का? फादर ऑलिव्हरची यादी काय असते? ती पेप्पर पूर्ण करू शकतो का? उघडपणे चुकीचा असलेला पेप्परचा समज फादर ऑलिव्हर खोडून का काढत नाहीत? या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी तुम्हाला हा एका लहान मुलाच्या निमित्ताने मोठ्या प्रश्नांना स्पर्श करणारा हृद्य पण विलक्षण चित्रपट आहे.
2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा कालावधी 1 तास 46 मिनिटे आहे.
हा चित्रपट पाहण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास लीलावती जयदेव ठाकूर ,विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज कमल एकनाथ शिंपी,
रेडिओ विश्वासच्या.कार्यकारी संचालक ऋचिता महाजन-ठाकूर यांनी केले आहे.

