
कस्तुरबा नगर नाशिक (प्रतिनिधी): “शिकण्याला वयाची मर्यादा नसते” या विश्वासाला साकार रूप देत रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, नाशिक यांच्या वतीने कार्यरत असलेल्या वस्त्यांपैकी कस्तुरबा नगर वसाहत येथे महिला साक्षरता वर्गाचा शुभारंभ करण्यात आला.कस्तुरबा नगरातील अनेक महिलांनी वाचन-लेखन शिकण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर व सक्षम बनविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.या साक्षरता वर्गासाठी दिशा क्लासच्या सुधा मेहता यांचे मार्गदर्शन लाभले असून, वर्गाचे नियमित अध्यापन संगीता देशमुख करणार आहेत. तसेच गिव्ह वेलफेर फाऊंडेशन, नाशिक यांच्या सहकार्याने महिलांना पाटी, पेन्सिल आणि ब्लॅकबोर्डचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणाची सुरुवात आवश्यक साहित्यांसह झाली.कार्यक्रमाला गिव्ह वेलफेर फाऊंडेशनच्या डॉ. ऋतुजा अय्यर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी रेडिओ विश्वासच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऋचिता ठाकूर यांनी महिलांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी नियमितपणे साक्षरता वर्गात सहभागी होऊन स्वतःचे आयुष्य अधिक सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण बनविण्याचे आवाहन केले.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निलोफर शेख, ज्ञानेश्वर शिरसाठ तसेच रेडिओ विश्वासच्या इतर सर्व टीम सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.या साक्षरता वर्गाला कस्तुरबा नगरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, या उपक्रमाची माहिती अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचत आहे. येत्या काळात आणखी अनेक महिला या साक्षरता वर्गाशी जोडल्या जातील आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबनाचा नवा प्रवास सुरू करतील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली. महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

