
नाशिक:-( प्रतिनिधी ) भारतीय राजकारणात संस्कार आणि तत्त्वनिष्ठतेचा आदर्श निर्माण करणारे कविहृदयाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे भारताचे देदीप्यमान तारे आहेत, असे प्रतिपादन गोदावरी बँकेच्या चेअरमन अमृता पवार यांनी केले.
सावानाच्या औरंगाबादकर सभागृहात पुणे येथील वैशाली प्रकाशन प्रकाशित आणि सप्तर्षी माळी लिखित ‘अटलनामा’, स्वाती उपाध्ये लिखित ‘ अटलबिहारी वाजपेयी’ (इंग्रजी), मोहित पुरोहित लिखित ‘भारतरत्न लालकृष्ण अडवाणी’ या तीन पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सावानाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, सावानाचे ग्रंथसचिव देवदत्त जोशी, प्रकाशक विलास पोतदार आणि तिन्ही लेखक उपस्थित होते.
अमृता पवार पुढे म्हणाल्या की, तिन्ही पुस्तकांमध्ये संयमी अटलबिहारी वाजपेयी आणि आक्रमक व्यक्तिमत्त्वाचे लालकृष्ण अडवाणी यांच्या सर्वांगीण कार्याचा आढावा लेखकांनी घेतला आहे. आजच्या पिढीने ही आशयसंपन्न चरित्रं वाचून आपली दिशा ठरवावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाध्यक्ष प्रा.दिलीप फडके, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, सुनील केदार, अमृता पवार, देवदत्त जोशी यांनीही आपल्या भाषणात अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत या व्यक्तिमत्त्वांच्या वाटचालीवर प्रकाश टाकला.
ज्येष्ठ पत्रकार आणि अनुवादक डॉ.वैशाली बालाजीवाले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. लेखक सप्तर्षी माळी, स्वाती उपाध्ये, मोहित पुरोहित यांचीही समायोचित भाषणे झाली.
नाशिक महानगरपालिका भाजपा गटनेते ॲड.श्याम बडोदे, नगरसेविका जुई शिंदे, नगरसेवक सतीश निकम, गणेश बोलकर यांच्यासह सावाना पदाधिकारी आणि साहित्यिकांची उपस्थिती होती. अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘भारत जमीन का टुकड़ा नहीं’ या प्रसिद्ध कवितेचे वाचन कवी अरुण इंगळे यांनी केले. प्रकाशक विलास पोतदार यांनी प्रास्ताविक केले. कवी रवींद्र मालुंजकर सूत्रसंचालन केले.

