
खडकजांब (प्रतिनिधी) खडकजांब येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन २७ जून रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे होते.यावेळी इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच विद्यालयाच्या इमारतीच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल डॉ. सयाजीराव गायकवाड यांचा ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.मान्यवरांनी ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाचा विस्तार, रोजगाराभिमुख शिक्षण आणि विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमास मविप्र संस्थेचे पदाधिकारी, संचालक, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, शिक्षक, पालक आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवटी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले. नूतन विद्यालयाच्या उद्घाटनामुळे खडकजांब व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची नवी दारे खुली झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

