
नांदगाव ( प्रतिनिधी ): नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक संचलित स्वर्गीय मिश्रीलाल भिकचंद छाजेड विद्या मंदिर, नांदगाव येथे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती व्हावी, तसेच त्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला वाव मिळावा, या उद्देशाने शाडू मातीपासून गणपती बनविण्याची कार्यशाळा उत्साहात आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेस शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जाधव मॅडम, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती आशादेवी सोनवणे तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री. नारळे सर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
या उपक्रमात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शाळेच्या सहशिक्षिका सौ. शुभांगी जानराव व श्रीमती अर्चना बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणपतीची मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने सुंदर गणेशमूर्ती तयार करून आपल्या कलागुणांचे व सर्जनशीलतेचे दर्शन घडविले.
तसेच इयत्ता चौथीचे वर्गशिक्षक श्री. महाले सर, श्री. जाधव सर व श्रीमती खानदेशी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी शाडू मातीचा वापर, पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश मिळाला. शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती पर्यावरणासाठी अधिक अनुकूल असल्याने पारंपरिक उत्सव साजरा करताना निसर्गाचे संवर्धन करण्याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यशाळेला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.

