
सिन्नर:- “मातेच्या संस्कारातून घडले शिवबा,शिवबाच्या पराक्रमाने उजळला महाराष्ट्र!” या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित ‘शिवमातृतीर्थ’ भित्तिशिल्पाचे अनावरण मातोश्री चंद्रभागाबाई व अयोध्याबाई चांडक कन्या विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाशभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनातून व दीप्तीताई राजाभाऊ वाजे यांच्या देणगीतून मिळालेले हे भित्तिशिल्प नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष मारुतीराव कुलकर्णी व प्रकाशभाऊ वाजे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे मातृत्व,संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या संस्कारमय जीवनाची प्रेरणा देणारे हे भित्तिशिल्प विद्यार्थिनींसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे.यावेळी संस्थेचे सेक्रेटरी राहुल मुळे,फेलोज राजेंद्र देशपांडे,सहखजिनदार हेमंत देशपांडे,शालेय समिती अध्यक्ष ॲड.श्रीराम क्षत्रिय,माजी मुख्याध्यापिका माधवी पंडित,शेठ ब.ना.सारडा विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष बापू पंडित,पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे,प्रभारी मुख्याध्यापिका सुवर्णा सोनवणे यांच्यासह सिन्नर नगरपालिकेचे नगरसेवक,शहरातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थीनी व पालक उपस्थित होते.

प्रास्ताविकात राजेंद्र देशपांडे यांनी प्रकाशभाऊ वाजे यांचे आजोबा कै. बाळाजी वाजे यांच्या समाजकार्याचा परिचय करून देत भित्तिशिल्प देण्यामागील पार्श्वभूमी स्पष्ट केली. ‘जिजाऊंच्या संस्कारातून शिवरायांचे व्यक्तिमत्त्व घडले. विद्यार्थिनींना त्यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हे भित्तिशिल्प शाळेला दिले’,असे प्रकाशभाऊ वाजे यांनी सांगितले.’जिजाऊंनी शिवरायांना घडविले, त्याप्रमाणे विकसित भारत घडविण्यासाठी चांगली आई होणेही महत्त्वाचे आहे. त्यातून चांगली पिढी घडेल’,असे प्रतिपादन मारुतीराव कुलकर्णी यांनी केले.’तुम्ही मातृशक्ती आहात. या शिल्पातून प्रेरणा घेऊन भविष्यात वाटचाल करा’असे आवाहन राहुल मुळे यांनी विद्यार्थिनींना केले.बालवयात झालेले संस्कार पुढील आयुष्यासाठी महत्त्वाचे ठरतात, असे ॲड. श्रीराम क्षत्रिय यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लेझीम व झांजपथकाने प्रात्यक्षिक सादर करून मान्यवरांचे स्वागत केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते शिवरायांची आरती करण्यात आली. यावेळी शिल्पकार योगेश पाळदे यांचा सत्कार करण्यात आला.पाहुण्यांचा परिचय निलिमा दुसाने यांनी करून दिला. सूत्रसंचालन संयुक्ता कुलकर्णी यांनी केले, तर आभार आयटीआयचे प्राचार्य शिवराज सोनवणे यांनी मानले.चांडक कन्या विद्यालय परिवाराच्या नियोजनातून हा सोहळा प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

