
मांडीला चावा घेतल्याचे दाखविताना जख्मी शंकर बुधा गायकवाड.
न्यायडोंगरी (प्रतिनिधी) एका बिथरलेल्या माकडाने गेल्या दोन दिवसांपासून न्यायडोंगरी धुमाकूळ घातला असून गावातील शंकर बुधा गायकवाड या व्यक्तीस मांडीला जबर चावा घेऊन जख्मी केले तर हायस्कूलचे उप मुख्याधापक संदीप पाटील व प्रयोगशाळा परिचर नंदकुमार निकम यांना नखाने ओरबाडून किरकोळ जख्मी केल्याने गावात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या बाबतची माहिती त्वरीत नांदगाव वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली असता वन विभागाच्या रेस्क्यु टीमने दोन दिवसांचे अथक प्रयत्नानंतर या माकडास जेरबंद करण्यात यश मिळविल्याने न्यायडोंगरीकराणी सुटकेचा निश्वास सोडला व सर्व रेस्क्यू टीमचे आभार मानले.

वन विभागाची रेस्क्यु टीम.
या बाबत सविस्तर माहिती अशी की अत्यंत भयभीत व बिथरलेल्या अवस्थेत असलेले एक माकड दोन दिवसांपासून गावात आले होते, त्याने त्याचा मुख्य अड्डा हायस्कूल व कॉलेजचा परिसर करून शाळेच्या प्रांगणात दिसणारे शिक्षक व विद्यार्थी लक्ष करून त्यांच्या खांद्यावर उडी घेऊन बसणे पायाला मिठी मारून घट्ट पकडुन नखाने ओरबाडून किंवा चावा घेऊन जख्मी करणे अशा प्रकारे धुमाकूळ घातला होता.वन विभागाने संपूर्ण एक दिवस त्याचा पाठलाग करून जाळी टाकून पकडण्याचा प्रयत्न केला परंतु या टीमला हुलकावणी देण्यात हे माकड यशस्वी झाल्याने दुसऱ्या दिवशी शॉट गनने इंजेक्शन देऊन माकडास बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. या कामी नांदगाव येथील वन विभागाच्या रेस्क्यु टीमने सलग दोन दिवस अथक परिश्रम घेऊन ही कामगिरी यशस्वी केल्याने सर्व गावकऱ्यांनी त्यांना धन्यवाद दिले.

वन विभागाची रेस्क्यु टीम.

