
दिंडोरी 🙁 प्रतिनिधी ) समाजाचा सर्वांगीण विकास आणि उद्धार करायचा असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे प्रतिपादन माजी प्राचार्य डॉ. डी. बी. शिंदे यांनी केले.
दिंडोरी येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात समाजदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. शिंदे यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. समाज परिवर्तनासाठी शिक्षण हेच प्रभावी माध्यम असून, शिक्षणाच्या माध्यमातूनच सामाजिक जाणीव आणि विकासाची वाटचाल शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी मुख्याध्यापक प्राचार्य प्रफुल्ल नांडे यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी ध्वजास सलामी दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रतिभा वाघ होत्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. आप्पासाहेब शिंदे, डॉ. दिलीप शिंदे, नगरसेवक सुजित मुटकुळे, माजी उपसभापती अनिल देशमुख, मनोज दिघे, प्रकाश वाघ, सुनील वाघ, संतोष पाटील, भाऊसाहेब पाटील, सूर्यकांत राजे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
आपल्या भाषणात डॉ. शिंदे यांनी कर्मचाऱ्यांनी समाज सुधारणा आणि शिक्षण प्रसारासाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले. समाजाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्राचार्य डॉ. प्रतिभा वाघ यांनी अध्यक्षीय भाषणातून कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा विविध स्पर्धांमधील यशाबद्दल तसेच शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीमती सायली होळकर यांनी केले, तर आभार प्रा. श्रीमती प्रतिक्षा गरुड यांनी मानले.

