
सिन्नर (प्रतिनिधी)एस. के. कला व वाणिज्य महाविद्यालय नायगांव येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. प्रमोद भडकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. धनलक्ष्मी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस डॉ. कुणाल कातकाडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून धनलक्ष्मी शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. उज्ज्वला कातकाडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. टी. खैरनार यांनी केले. धनलक्ष्मी शिक्षण संस्थेची वाटचाल तसेच पदवी नंतर पदव्युत्तर टप्प्यापर्यंतचा प्रवास यावेळी डॉ. के. टी. खैरनार यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडला. कार्यशाळे करिता मार्गदर्शक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. प्रमोद भडकवाडे उपस्थित होते. विद्यापीठातील विविध विभागांतील कामकाज व त्यातील बारकावे डॉ. प्रमोद भडकवाडे यांनी यावेळी सांगितले. तसेच परीक्षा पद्धत, विद्यापीठाचे संकेत स्थळ व त्यावरून मिळणारी महत्वपूर्ण शैक्षणिक माहिती याबद्दल भडकवाडे सरांनी ओघवत्या शैलीने माहिती दिली. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण यशाच्या दृष्टीने वाटचाल करावी हा संदेश त्यांनी यावेळी दिला. विद्यार्थ्यांसोबत प्राध्यापक वर्गाला देखील शैक्षणिक कामकाज व विद्यापीठ कार्यप्रणाली याबाबत माहिती दिली. तसेच मार्गदर्शक म्हणून दुसऱ्या सत्रात माजी औद्योगिक निरीक्षक दिलीप उदावंत यांनी उद्योग व व्यवसाय याबाबत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत योग्य दिशा दिली. सदर कार्यक्रम प्रसंगी विभाग प्रमुख प्रा. प्रल्हाद पानसरे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. गोरख वाघले, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. शुभम जाधव, प्रा. सतीश कापडी, प्रा. सुरेश थोरात, प्रा.शुभांगी आव्हाड, प्रा. सोनाली खुर्चे, प्रा. वैशाली रिपोटे, प्रा. नर्गिस अन्सारी, प्रा. डॉ. ज्योती गायकवाड तसेच विद्यार्थी व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. मंगल सांगळे यांनी केले.

