
अमेरिकेत क्युबिओ इनोव्हेशन हब येथे सल्लागार (मेंटॉर) म्हणून निवड
नाशिक (रविंद्र मालुंजकर):- येथील वाय.डी.बिटको हायस्कूलमधील शिक्षिका सीमा कोळी आणि सेवानिवृत्त मनपा शिक्षक भालचंद्र कोळी यांच्या स्नुषा डॉ.फेनाली पारेख-कोळी यांची अमेरिकेत क्युबिओ इनोव्हेशन हब येथे सल्लागार (मेंटॉर) म्हणून निवड झाल्याने नाशिकच्या स्नुषेने उत्तुंग भरारी घेतली आहे. अमेरिकेतील ह्युस्टन येथील बायोटेक कंपनीचे युवा उद्योजक आणि नाशिकचे भूमिपुत्र आकाश कोळी यांच्या त्या पत्नी आहेत.
क्युबिओ इनोव्हेशन हबमध्ये बायोटेक स्टार्टअपचे फाऊंडर आणि रिसर्चस यांना प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि सायंटिफिक स्टार्टेजीबाबत मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मधुमेह, कॅन्सर, फुफ्फुसाचे विकार यांसारख्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या बायोटेक कंपनीज आहेत. अशा महत्त्वाच्या व्यवस्थापनात डॉ.फेनाली आकाश कोळी यांची मेन्टार म्हणून निवड झाली आहे.
डॉ.फेनाली कोळी या मूळच्या पुण्याच्या असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून बी.एस्सी. आणि एम.एस्सी. बायोटेक्नॉलॉजी करत असताना त्यांनी नॅनो टेक्नॉलॉजी आणि सिल्व्हर नॅनो पार्टिकल्समध्ये संशोधन केले. त्यांचे अनेक संशोधन पेपर्स प्रकाशित झाल्याने त्यांचे सुरुवातीचे संशोधन पुढील संशोधनांमध्येही संदर्भ म्हणून वापरले गेले.
एम.एस्सी.नंतर त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय केमिकल प्रयोगशाळेत संशोधक विद्यार्थी म्हणून काम केले. अमेरिकेत मोन्टाना स्टेट विद्यापीठात पीएच.डी. करत असताना सहाय्यक प्राध्यापक म्हणून जेनेटिक्स या विषयाचे अध्यापन केले. तसेच हायस्कूलमधील मुलींसाठी सायन्स सेमिनार घेऊन त्यांना सायन्स आणि रिसर्च क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित केले. या दरम्यान त्यांचे संशोधन पेपर्स प्रतिष्ठित सायंटिफिक जर्नल्समध्ये प्रकाशित झाले. अमेरिकेतील ड्रग डेव्हलपमेंट कंपनीमध्ये वैज्ञानिक म्हणून काम करत असताना त्यांच्या रिसर्च टीमने पुढे विकसित केलेल्या कामासाठी पेटंट मिळवले.
या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

