
नाशिक रोड : ३० ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त युनायटेड सर्व्हिसेस जिमखाना (USG), नाशिक रोड येथील बास्केटबॉल मैदानावर भव्य आमंत्रित बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुले, १४ वर्षांखालील मुली आणि पुरुष संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेचे सामने साखळी पद्धतीने घेण्यात आले.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ क्रीडा प्रशिक्षक व राष्ट्रीय निवड समिती सदस्य राजेश क्षेत्रीय, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आनंद (भाऊ) खरे, राष्ट्रीय स्पर्धेचे सुवर्णपदक विजेते व इंडिया रेफरी राहुल साळवे वरिष्ठ प्रशिक्षक सचिन साळवे, सौ. नयना साळवे, तसेच पालकवर्ग, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे आर्मी, एअरफोर्स, एच ए. एल, एम. एस.ई.बी., पोलीस विभाग यासह विविध नामांकित संघांनी सहभाग नोंदवून स्पर्धेची रंगत आणि प्रतिष्ठा वाढवली. विशेष म्हणजे स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील अनुभवी खेळाडूं सोबत नवोदित खेळाडूंनाही खेळण्याची संधी मिळाल्याने त्यांना अनुभवी खेळाडूंकडून मार्गदर्शन आणि खेळातील बारकावे शिकण्याचा मोठा फायदा झाला.

“खेळाडू घडवणे, त्यांना योग्य संधी देणे आणि पुढील पिढीमध्ये क्रीडासंस्कृती रुजवणे” या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा उत्साहात पार पडली. या माध्यमातून राष्ट्रीय क्रीडा दिनाचा खरा संदेश अधोरेखित झाला.
या स्पर्धेत पुरुष गटात पोलिस बॉईज क्लब, हिरावाडी संघाने अंतिम लढतीत एस.बी. ए. संघाचा ५४- ४९ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. तिसरा क्रमांक यजमान यू.एस. जिमखाना संघाने मिळविला.
१४ वर्षे मुलींच्या गटात प्रथम क्रमांक एच.ए.एल., ओझर संघाने, द्वितीय क्रमांक: यू.एस. जिमखाना संघाने तर तृतीय क्रमांक ओझर संघाने मिळविला.
१४ वर्षांखालील मुलांचा गटात शायनिंग स्टार स्कूलच्या संघाने उत्कृष्ठ खेळ करून अंतिम लढतीत एच.ए.एल., ओझर संघाला ४४- ४२ अशा अवघ्या दोन गुणांनी पराभूत करून विजेतेपद मिळविले, तर एच.ए.एल., ओझर संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, तृतीय क्रमांक सेंट झेवियर स्कूल, मनमाड आणि एस.बी.ए.या संघांना देण्यात आला. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सोहम जाधव (१४ वर्षे मुले), शायनिंग स्टार स्कूल,
देवांशी राय (१४ वर्षे मुली), एच.ए.एल., ओझर आणि खुल्या गटात सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गजानन पाटील, हिरावाडी पोलीस बॉईज क्लब यांना गौरवण्यात आले.
बक्षीस वितरण सगुणा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ गांगुर्डे आणि राष्टीय खेळाडू मेघा काळे यांच्या हस्ते संपन्न झाले. सर्व गटातील विजेत्या, उपविजेत्या आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या संघांना आकर्षक चषक आणि प्राविण्य प्रमाणपत्र प्रदान करून गौरवण्यात आले.
पंच म्हणून विक्रम बोरीकर, कैलास सिंघण, अश्रफ सय्यद,यश क्षत्रीय, मंगेश पाथरकर, स्तुती वासवानी, धनश्री आडके, टिशा बागचंदानी आदींनी आपली जबाबदारी पार पाडली.
स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यू.एस. जिमखानाचे महासचिव आर.एस. चामोली, सतीश भालेराव, अर्चित भालेराव, निशांत कुलकर्णी, सोहम कवडे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
तसेच येथील खेळाडू आणि कार्यकर्ते यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
स्पर्धेचा अंतिम निकाल :
१) १४ वर्षांखालील मुलांचा गट :
प्रथम क्रमांक: शायनिंग स्टार स्कूल
द्वितीय क्रमांक: एच.ए.एल., ओझर
तृतीय क्रमांक: झेवियर, मनमाड व एस.बी.ए.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू: सोहम जाधव – शायनिंग स्टार स्कूल
२) १४ वर्षांखालील मुलींचा गट :
प्रथम क्रमांक: एच.ए.एल., ओझर
द्वितीय क्रमांक: यू.एस. जिमखाना
तृतीय क्रमांक: ओझर
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू: देवांशी, एच.ए.एल., ओझर
वरिष्ठ गट – मुले :
प्रथम क्रमांक: हिरावाडी पोलीस बॉईज क्लब
द्वितीय क्रमांक: एस.बी.ए.
तृतीय क्रमांक: यू.एस. जिमखाना
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू: गजानन पाटील – हिरावाडी पोलीस बॉईज क्लब

