
बोयगाव, दि. ०२ सप्टेंबर २०२६ :
शालेय उपक्रमांतर्गत जनता विद्यालय बोयगाव, ता. नांदगाव यांच्या वतीने आज बुधवार, दि. ०२ सप्टेंबर २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी वनभोजन व शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीसाठी विद्यार्थ्यांनी अंकाई किल्ल्याला भेट देत निसर्गरम्य वातावरणाचा मनमुराद आनंद लुटला.
सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. अंकाई किल्ल्यावर पोहोचल्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. काटवाणी ए. आर. तसेच उपशिक्षक श्री. विसपुते पी. ए. यांनी विद्यार्थ्यांना अंकाई किल्ल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, परिसराचे पर्यटनदृष्ट्या असलेले महत्त्व तसेच ऐतिहासिक व पर्यटनस्थळांची स्वच्छता राखण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

यानंतर विद्यार्थ्यांनी नागापूर येथील शिव मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. संपूर्ण सहलीदरम्यान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता. शैक्षणिक ज्ञानासोबतच निसर्ग, इतिहास, संस्कृती आणि स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून समजले.
सदर वनभोजन व शैक्षणिक सहल यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत सहलीचे नियोजन करण्यात आले. या आनंददायी आणि शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांना अविस्मरणीय अनुभव मिळाला.

