
नाशिक (प्रतिनिधी) : विश्वास ग्रुप, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपुर, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गझल विश्वास मैफिलीने गझलप्रेमींना एक अविस्मरणीय अनुभव दिला या मैफिलीत. नंदकिशोर ठोंबरे ,हिरालाल बागुल ,अतुल देशपांडे ,जयश्री कुलकर्णी
अनिकेत सागर ,सुरेश चौरे ,योगेश जाधव यांनी सहभाग घेतला
सुत्रसंचालन रूपाली खैरनार-दिवेकर यांनी केले
विविध अनुभूती, सामाजिक वास्तव, मानवी नातेसंबंध, जीवन-मृत्यूचे गूढ आणि संघर्षातून मिळणारी जगण्याची प्रेरणा अशा विविध भावविश्वांना शब्दरूप देणाऱ्या गझल रचना रसिकांच्या मनाला स्पर्शून गेल्या. प्रत्येक गझलकारानेआपल्या स्वतंत्र अनुभवविश्वातून जीवनाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी दिली.

नंदकुमार ठोंबरे यांच्या,
“तुझ्या माझ्यामध्ये अंतर नको होते
मला भक्तीत अवडंबर नको होते.”
या ओळींमधून नात्यांमधील निरपेक्ष जवळीक आणि भक्तीतील निर्मळतेची अपेक्षा व्यक्त झाली आहे. माणूस आणि ईश्वर यांच्यातील नाते असो वा दोन मनांमधील नाते त्यामध्ये कृत्रिमतेचे, अंतराचे आणि दिखाव्याचे स्थान नसावे, अशी साधी पण अत्यंत गहन भावना या रचनेतून प्रकट होते. भक्ती ही अंतःकरणातून उमलावी, तिच्यावर अवडंबराचे आवरण चढू नये, असा या ओळींचा आशय आहे. हिरालाल बागूल यांच्या,
“डोळ्यादेखत हिरवा त्याचा माल जाळतो
शेतकऱ्याला जीतेपणी दुष्काळ जाळतो.”
या ओळींनी शेतकऱ्याच्या वेदनेला अत्यंत प्रभावी शब्द दिले आहेत. हिरव्यागार शेतातील उभे पीक निसर्गाच्या कोपाने नष्ट होत असताना शेतकरी केवळ आर्थिक संकटातच सापडत नाही, तर त्याच्या मनातील आशा आणि स्वप्नेही होरपळून निघतात. दुष्काळ हा केवळ जमिनीचा नसतो, तर तो शेतकऱ्याच्या जीवनाचा, घराचा आणि स्वप्नांचाही दाह बनतो, हे या रचनेतून प्रकर्षाने जाणवते.
अतुल देशपांडे यांनी जीवन आणि मृत्यूच्या गूढ नात्याचे अत्यंत सूचक चित्रण करताना म्हटले आहे,
“आयुष्याच्या नाटकातली जशी भूमिका संपत जाते
रहस्य कायम ठेवत मृत्यू हळूच पडदा पाडत आहे.”
जीवन हे एका रंगमंचावरील नाटकासारखे आहे आणि प्रत्येक व्यक्ती आपापली भूमिका निभावत असते. मात्र भूमिका केव्हा संपेल आणि अंतिम पडदा कधी पडेल, हे रहस्य कायमच राहते. मृत्यूच्या अटळ सत्याकडे भयाने नव्हे, तर जीवनाच्या एका अपरिहार्य समाप्तीच्या रूपाने पाहण्याची चिंतनशील दृष्टी या ओळी देतात.
जयश्री कुलकर्णी यांच्या,
“राहिल्या मोडायच्या कित्येक साड्यांच्या घड्या
देह त्याने ठेविता गेली सती मग हौस ही”
या ओळी स्त्रीमनातील अपूर्ण राहिलेल्या इच्छांचे आणि सामाजिक संकेतांनी बांधलेल्या आयुष्याचे हळवे चित्र उभे करतात. संसाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःच्या छोट्या-छोट्या हौशीही मागे पडतात. मात्र जीवनाचा अंतिम क्षण समोर उभा ठाकल्यावर त्या न जगलेल्या इच्छांची, न अनुभवलेल्या आनंदांची आठवण अधिक तीव्रतेने मनात दाटून येते. स्त्रीच्या अव्यक्त भावविश्वाला स्पर्श करणारी ही रचना अंतर्मुख करते.
सुरेश चौरे यांच्या,
“लागली जोरात होती ठेच पण ती
पावलांना चालणे शिकवून गेली”
या ओळी संघर्षाकडे सकारात्मकतेने पाहण्याची प्रेरणा देतात. आयुष्यातील ठेच ही केवळ वेदना देणारी नसते; ती माणसाला सावध करते, अनुभव देते आणि पुढील वाटचालीसाठी अधिक सक्षम बनवते. अपयश आणि अडचणींना पराभव न मानता त्यातून शिकण्याची जीवनदृष्टी या साध्या, नेमक्या आणि आशयघन ओळींतून व्यक्त होते.
योगेश जाधव यांच्या,
“काय झाले माणसाला बोलतांना, वागतांना,
थांब थोडे माणसा तू…”
या ओळी आजच्या धावपळीच्या, अस्वस्थ आणि संवेदनाहीन होत चाललेल्या जीवनशैलीवर नेमके भाष्य करतात. बोलताना आणि वागताना माणूस माणुसकीपासून दूर तर जात नाही ना, असा प्रश्न कवी उपस्थित करतात. थोडे थांबून स्वतःकडे, आपल्या वर्तनाकडे आणि नात्यांकडे पाहण्याचे आवाहन या रचनेतून केले आहे.
या सर्व रचनांमधून प्रेमातील निर्मळता, भक्तीतील साधेपणा, शेतकऱ्याची वेदना, मृत्यूचे गूढ, स्त्रीमनातील अपूर्ण इच्छा, संघर्षातून मिळणारी उमेद आणि माणुसकी जपण्याचा संदेश असे जीवनाचे अनेकविध पैलू उलगडले. शब्दांची ताकद केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून ती माणसाला अंतर्मुख करते, सामाजिक वास्तवाची जाणीव करून देते आणि जगण्याकडे नव्या नजरेने पाहण्याची प्रेरणा देते, याची प्रचिती या काव्यरचनांतून आली.
विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास लीलावती जयदेव ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचे आयोजक विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज कमल एकनाथ शिंपी, ‘ग्रंथ तुमच्या दारी’चे विनायकआशा पुरुषोत्तम रानडे, रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओच्या कार्यकारी संचालक ऋचिता महाजन-ठाकूर आहेत. कार्यक्रमाचे समन्वयक संजय सुभद्रा नानासाहेब गोरडे आहेत.
सावरकरनगर येथील विश्वास हब, येथे संपन्न झालेल्या मैफिलीने ‘गझल विश्वास’ या सातत्यपूर्ण साहित्यिक उपक्रमाचे 41 वे पुष्प खुलविले. आपल्या निवडक गझलांनी रसिकांना भावविश्वाच्या विविध रंगछटांत नेले.

