
अष्टभुज असणारी श्रीकृष्णाची मूळ मूर्ती.
श्रीकृष्णाची एकाच वेळी अनेक रूपे व लीला दाखवणारी मूर्ती
मोहाडी: भारतात सर्वत्र श्रीकृष्णाच्या दोन भुजा असणाऱ्या व हातात विशेषता: बासरी असणाऱ्या अनेक मूर्ती आपण पाहतो. परंतु आठ हात असणारी व एकाच वेळी श्रीकृष्णाच्या सर्व लीला धारण करणारी अष्टभुज मूर्ती मात्र आपल्याला सहसा पाहायला मिळत नाही. परंतु श्रीकृष्णाचे मुरलीधर, गिरीधर, शंखधर, चक्रधर, गोविंद, गोपाल, शस्त्रधारी अशी अनेक रूपे दाखवणारी मूर्ती मोहाडी (ता. दिंडोरी) व वृंदावन (मथुरा) या दोनच मंदिरात असल्याचे सांगितले जाते. दोन्ही ठिकाणच्या मूर्ती सारख्याच असून, त्या एकाच मूर्तिकाराने बनविल्या असल्याची आख्यायिका आहे.
या मूर्तीचे वर्णन पुराणात सुद्धा आढळते.अष्टभुजा पैकी कृष्णाच्या दोन हातात गाईंना मुग्ध करणारी मुरली आहे. एका हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत, इतर हातात शंख, चक्र, गदा, गोशृंगवाद्य आहे. भगवंताच्या चरण कमळाजवळ दोन गोपिका असून पैकी एक सनई तर दुसरी मृदंग वाजवत आहे. सवत्सधेनूसह भगवंताच्या अंगास कालियाने विळखा घातला असून, तो भगवंताच्या कानास दंश करत आहे. कमरेस लंगोट असून, त्यावर घागऱ्याचा दागिना आहे. विभूतीयोग सांगताना भगवंताने सांगितले की, गरुड पक्षात माझी विभूती आहे. तो गरुड पक्षी मूर्तीच्या चरणकमळाजवळ आहे. अशी ही श्रीकृष्णाची मूर्ती काळ्या रंगाच्या अखंड शालिग्राम दगडात आहे.

सजवलेली श्रीकृष्णाची मूर्ती.
या मूर्तीची आख्यायिका अशी : पुरातन काळी एक मूर्तिकार श्रीकृष्णाच्या आठ भूजा असणाऱ्या दोन मूर्ती घेऊन मथुरेला निघाला होता. प्रवासात एका सायंकाळी त्याचा मुक्काम त्याकाळी मोहाची झाडे असणाऱ्या छोट्या वाडीत म्हणजे आजच्या मोहाडी येथे पडला. सकाळी जेव्हा मूर्तिकार पुढील प्रवासासाठी निघाला तेव्हा त्यातील एक मूर्ती त्याला हलेचना. त्याने एवढ्या प्रवासात उचलून आणलेली मूर्ती त्याला प्रयत्न करूनही उचलता येईना. शेवटी कंटाळून उरलेली दुसरी मूर्ती घेऊन मूर्तिकार मथुरेला निघून गेला.म्हणजेच श्रीकृष्णालाही मोहाडीत राहण्याचा मोह झाला; म्हणून मोह पाडणारी वाडी म्हणून गावाला मोहाडी हे नाव पडले. या पार्श्वभूमीवर मोहाडीत रक्षाबंधनाच्या अगोदर आठ दिवस ते कृष्णजन्माष्टमी व गोपाळकाल्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत विविध कार्यक्रम व उत्साहाचे वातावरण असते. रक्षाबंधनाच्या आधी आठवडाभर या श्रीकृष्ण मंदिरात अखंडपणे 71 वर्षांपासून महाराष्ट्रातील नामवंत व्याख्यात्यांची विविध विषयांवर व्याख्याने आयोजित करून श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेल्या कर्मयोग व भक्तीयोगा बरोबर ज्ञानयोग साधला जातो. रक्षाबंधनच्या दिवशी उंच अशी झेंडाकाठी उभारली जाते. त्यानंतर आठ दिवस श्रीकृष्ण मंदिरात भागवत, हरिपाठ, चरित्रात्मक कीर्तने, भजन संध्या असे कार्यक्रम होतात. जन्माष्टमीच्या दिवशी मध्यरात्री श्रीकृष्ण जन्म होऊन मंदिरात मिळणारा पंजिरी या विशेष प्रसादाने लोक जन्माष्टमीचा उपवास सोडतात. गोपाळ काल्याच्या दिवशी दहीहंडी तसेच कान्होबा मंदिरात वाद्याचा कार्यक्रम होतो. यानिमित्त गावात दोन दिवस भव्य यात्रा आणि कुस्त्यांची विराट दंगल होते.

