
नाशिक रोड दिनांक ४ सप्टेंबर : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, नाशिक रोड येथे पालक-शिक्षक संघाची सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व शिक्षक यांच्यात सुसंवाद आणि समन्वय वाढविणे हा या सभेचा प्रमुख उद्देश होता.
या सभेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे होते. उपाध्यक्षा म्हणून महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. राधा पाटील उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयाचे पर्यवेक्षक क्षीरसागर सर, पालक-शिक्षक संघाच्या सचिव सौ. तांदळे मॅडम यांच्यासह पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पालक-शिक्षक संघाच्या पालक समन्वयक म्हणून सौ. रुपाली पाटील व सौ. नयना कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुजाता गायकवाड यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, उपस्थिती, शिस्त, पालक-शिक्षक संवाद तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा संदर्भात विविध विषयांवर मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक आणि शिक्षकांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. पालकांचा सक्रिय सहभाग विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. पालक शिक्षक संघाच्या या सभेत महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष २०२६- २७ मध्ये आकारलेले शुल्क हे सर्वानुमते मंजूर करण्यात आले तसेच २८ जुलै,२०२६
च्या अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य आयुक्त यांच्या आदेशान्वये अन्नसुरक्षा व मानके विधी नियम २०२० यांच्या अंमलबजावणी व सक्तीच्या पालनासाठी राज्यव्यापी अनुपालन आदेशाचे सविस्तर वाचन करून पालकांना त्याबाबत अवगत करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना, विद्यार्थी सुरक्षा योजना,तसेच बोर्डाच्या काॅपी मुक्त अभियानाची माहिती पालकांना देण्यात आली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. अनुराधा वाघ यांनी केले. पालक, शिक्षक, मान्यवर तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
पालक-शिक्षकांच्या सकारात्मक सहभागामुळे आणि सहकार्यामुळे सभा यशस्वीरीत्या संपन्न झाली.

