
नांदगाव, (प्रतिनिधी, )
ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ, नाशिक आणि नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक संचलित वैजनाथ जिजाजी (तांत्रिक) विद्यालय, नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य आनंद जोर्वेकर व त्र्यंबक बापूजी ठोमरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित २७ व्या ‘बालकवी काव्यवाचन स्पर्धे’ला नांदगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

तालुक्यातील १७ शाळांमधील तब्बल १५५ स्पर्धकांनी तीनही गटांत सहभाग नोंदवत कविता, साहित्य व अभिव्यक्तीचा सुंदर आविष्कार सादर केला.
स्पर्धेचे उद्घाटन सकाळच्या सत्रात विद्यालयाचे माजी विद्यार्थी व प्रसिद्ध उद्योजक,, नगरसेवक मान. श्री. दत्तराज छाजेड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. लक्ष्मीकांत ठाकरे यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेची भूमिका व उद्देश स्पष्ट केला.

तत्पूर्वी इयत्ता ८ वी अ मधील कु. नक्षत्रा घुगे व तिच्या मैत्रिणींनी ईशस्तवन सादर केले. त्यांना श्री. राजेश भामरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेत प्रथम गटात इयत्ता ३ री ते ५ वीचा बाल गट, द्वितीय गटात इयत्ता ६ वी ते ८ वीचा किशोर गट आणि तृतीय गटात इयत्ता ९ वी ते १२ वीचा कुमार गट अशा तीन गटांत काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली. विशेष म्हणजे बाल गटातच ८८ स्पर्धकांनी सहभाग घेतला.

स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. सुरेश नारायणे (कुमार गट), सुप्रसिद्ध कवयित्री सौ. प्रतिभा खैरनार (किशोर गट), तसेच सौ. अक्षदा कुलकर्णी व श्रीम. ज्योत्स्ना चव्हाण (बाल गट) यांनी अत्यंत काटेकोरपणे पार पाडली.
मान्यवर परीक्षक व प्रमुख अतिथींचा परिचय श्री. प्रविण अहिरे यांनी करून दिला, तर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. लक्ष्मीकांत ठाकरे यांनी त्यांचे नॅपकिन व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी प्रमुख अतिथी श्री. दत्तराज छाजेड यांचा ज्ञानवर्धिनी संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

स्पर्धेचे आयोजन व्हि.जे. हायस्कूल च्या संयुक्त विद्यमाने ज्ञानवर्धिनी संस्थेचे श्री. राजेश भुसारे, श्री. नितीन कापडणीस, सौ. वैशाली भोसले व सौ. कांचन लवटे यांनी केले.
ह्यावेळी अकॅडमिक बोर्डाचे सदस्य श्री. गुलाब पाटील, श्री. भास्कर मधे, सौ. रूपाली झोडगेकर व श्री. मुकुंद बागूल, तसेच दोन्ही सत्रांतील शिक्षक प्रतिनिधी श्रीम. सुनीता देवरे व श्री. सुरेश नवसारे यांच्यासह तालुक्यातील विविध शाळांचे स्पर्धक व मार्गदर्शक शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचा सन्मान
दुपारच्या सत्रात झालेल्या पारितोषिक वितरण समारंभासाठी मनमाड येथील सुप्रसिद्ध कवी व लेखक मान. श्री. संदीप देशपांडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. परीक्षक श्री. सुरेश नारायणे यांनी आपल्या मनोगतात सर्व स्पर्धक, मार्गदर्शक शिक्षक व सहभागी शाळांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांसाठी आगामी काळात साहित्यविषयक लेखन कार्यशाळा घेण्याचा मानस व्यक्त केला.
प्रमुख अतिथी श्री. संदीप देशपांडे यांनी आपल्या ओघवत्या व विनोदी शैलीतील मनोगताने उपस्थितांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी ह्या वयात वाचणे, लिहिणे व कविता करून सादरीकरण करणे ह्या गोष्टी मोबाईलच्या जमान्यात कौतुकास्पद आहेत; असे विचार त्यांनी ह्याप्रसंगी व्यक्त केले.
विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या कवितांवर आधारित काव्यसंग्रह स्वतःच्या पुढाकाराने प्रकाशित करून देण्याची उत्स्फूर्त इच्छाही त्यांनी ह्यावेळी व्यक्त केली.
त्यानंतर तीनही गटांचा निकाल जाहीर करण्यात आला. विजेत्या विद्यार्थ्यांसह सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ज्ञानवर्धिनी संस्थेचा ‘रूपेरी काव्यहोत्र’ हा काव्यसंग्रह देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या नियोजनासाठी शिक्षकांचा विशेष गौरव
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी गेल्या आठ-पंधरा दिवसांपासून नांदगाव तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन स्पर्धापत्रिका वाटप, नियोजन व इतर विविध जबाबदाऱ्या पार पाडणारे विद्यालयातील श्री. प्रविण अहिरे, श्री. कुणाल जोशी व सौ. रूपाली झोडगेकर यांचा ज्ञानवर्धिनी संस्था व विद्यालयाच्या वतीने पुष्प देऊन विशेष गौरव करण्यात आला.
दोन्ही सत्रांचे सूत्रसंचालन श्री. मुकुंद बागूल यांनी ओघवत्या शैलीत केले, तर श्रीम. सुनीता देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रमुख मान्यवर, परीक्षक व तीनही गटांतील यशस्वी स्पर्धकांचा सामूहिक छायाचित्राचा क्षण टिपल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक श्री. लक्ष्मीकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील सकाळ व दुपार सत्रातील विविध समित्यांमधील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
🏆 बालकवी काव्यवाचन स्पर्धेचा निकाल
स्पर्धेच्या तीनही गटांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी स्पर्धकांची नावे घोषित करण्यात आली.
बाल गट – इयत्ता ३ री ते ५ वी :
प्रथम क्रमांक कु. साहिल युवराज बोरसे (साकोरा), द्वितीय क्रमांक कु. शिवन्या प्रविण छत्रे (साकोरा), तर तृतीय क्रमांक कु. अकीरा अमिन लोखंडे (साकोरा) यांनी मिळविला. कु. आराध्या अमोल सुरसे (साकोरा), कु. द्विज विक्रम घुगे (नांदगाव) आणि कु. स्वामी योगेश पेंढारकर (नांदगाव) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
किशोर गट – इयत्ता ६ वी ते ८ वी :
प्रथम क्रमांक कु. भावना प्रकाश गुढेकर (नांदगाव), द्वितीय क्रमांक कु. रोनक रविंद्र बनसोड (मनमाड), तर तृतीय क्रमांक कु. अवनी दिनेश बजाड (नांदगाव) यांनी पटकाविला. कु. यामिनी निबांजी चव्हाण (नांदगाव) आणि कु. श्रीकृष्ण माधव कुमावत (नांदगाव) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
कुमार गट – इयत्ता ९ वी ते १२ वी :
प्रथम क्रमांक कु. आयुष वाळीबा काकड (मनमाड), द्वितीय क्रमांक कु. वैष्णवी कैलास सानप (मनमाड), तर तृतीय क्रमांक कु. श्रद्धा ज्ञानेश्वर बोगीर (नांदगाव) यांनी मिळविला. कु. पूजा भास्कर ठोंबरे (पोखरी) आणि कु. प्रज्ञा राजेंद्र जाधव (नांदगाव) यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरविण्यात आले.
ह्या सर्व १५ यशस्वी स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ज्ञानवर्धिनी संस्थेचा ‘रूपेरी काव्यहोत्र’ हा काव्यसंग्रह देऊन गौरव करण्यात आला. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व १५५ स्पर्धकांनाही प्रमाणपत्र व काव्यसंग्रह देऊन त्यांच्या साहित्यिक सहभागाचे कौतुक करण्यात आले.
काव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला, अभिव्यक्तीला आणि साहित्यिक जाणिवेला व्यासपीठ मिळवून देणारी ही स्पर्धा नांदगावच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील एक उल्लेखनीय उपक्रम ठरली.


