
सर्वधर्मियांचे सणोत्सव, समारंभ, मिरवणुका हे पर्यावरणपूरक- पर्यावरणस्नेही साजरे करण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश काढावेत, अशा आशयाचे निवेदन मा. जिल्हाधिकारी, नाशिक यांना देताना महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टि. आर. गोराणे.
आगामी काळात विविध जाती- धर्मांचे सण-उत्सव- समारंभ, मिरवणुका,सार्वजनिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे होण्याची शक्यता आहे.
परिणामी मोठ्या प्रमाणात ध्वनी, वायू, जल वा तत्सम घटकांचे प्रदूषण होण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे सार्वजनिक आरोग्य, नैतिक मूल्य तसेच कायदा सुव्यवस्था याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.
यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ध्वनी, वायू , जल किंवा तत्सम सर्व प्रकारचे प्रदूषण होणार नाही यासाठी सर्व संबंधितांना तातडीने कायदेशीर प्रतिबंधात्मक लेखी स्वरूपात आदेश काढावेत, तसेच जनजागृती होण्यासाठी आत्तापासूनच प्रसारमाध्यमातून तशा आशयाच्या सूचना, आवाहने यांचे प्रसारण करावे.
अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्य प्रधान सचिव डॉ.टि. आर. गोराणे यांनी जिल्हाधिकारी नाशिक यांना सादर केले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,
सण -उत्सव -समारंभ साजरे होत असताना प्रचलित कायद्याचे जे लोक उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी.
माणूस हा उत्सव प्रिय प्राणी आहे. म्हणून सर्वच सण- उत्सव -समारंभ हे मानवी समूहाच्या आनंदासाठी, राष्ट्रीय एकता व एकात्मता दृढ होण्यासाठी साजरे केले जाणे अपेक्षित आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मागील पस्तीस वर्षांपासून सातत्याने पर्यावरण पूरक – पर्यावरणस्नेही सण- समारंभ- उत्सव साजरे करण्याचा कृतीशील धरीत आलेली आहे.
अनेक ठिकाणी विधायक पर्याय संघटनेने दिलेले आहेत.
त्याचा अतिशय इष्ट परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.
एक उदाहरण द्यायचे झाले तर पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतामध्ये निर्माल्य व मूर्ती विसर्जित करू नये, यासाठी लोकप्रबोधनासह, त्यांचे संकलन करून , भाविकांच्या श्रद्धेचा आदर राखून, त्यांचे वापरात नसलेल्या पाण्यामध्ये विसर्जन केले जाते. त्याला आता भाविकही प्रचंड प्रतिसाद देतात, असा मागील अनेक वर्षांपासून अनुभव आलेला आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुरू केलेले हे पर्यावरणपूरक काम महाराष्ट्र शासन- प्रशासनाने स्वतःचे काम म्हणून, सुरू केले आहे.
मात्र अजूनही अनेक ठिकाणी कायदेशीर बाबींची काटेकोर अंमलबजावणी होत नाही, असे दिसून येते.
अलीकडील काळात अनेक सण- उत्सवांना,समारंभाना, मिरवणुकीना जाती-धर्माची, संस्कृतीची खोटी लेबलं लावून,ते साजरे करण्याचा अट्टाहास निसर्गाला ओरबाडून किंवा त्याला प्रचंड हानी पोहोचूनच साजरे केले जातात, ही अतिशय लांच्छनास्पद व क्रूर बाब आहे.
विशेष म्हणजे या पर्यावरणाला मारक ठरणाऱ्या अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा यांना अनेक राजकीय व्यक्ती, पक्ष मताच्या स्वार्थासाठी जाणीवपूर्वक धार्मिकतेचे स्वरूप देतात आणि आर्थिक स्वरूपात संबंधितांना पाठबळ पुरवतात, खतपाणी घालतात असेही दिसून येते.
लोकांना त्यांच्या धार्मिक श्रद्धेचा निख्खळआनंद व समाधान मिळण्याऐवजी अनेक प्रसंगात अपघात होऊन काही भाविकांचा मृत्यू होणे, अवयव निकामी होऊन कायमचे अपंगत्व येणे, अशाही गंभीर घटना अनेक ठिकाणी घडताना दिसतात.
म्हणून हे सर्व अमानुष, अनिष्ट, मानवी जीवनाला व पर्यावरणाच्या नाशाला कारणीभूत ठरणारे प्रकार रोखण्यासाठी त्या त्या बाबतीत प्रचलीत असलेल्या कायद्यांबद्दल नाशिक शहरासह, संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना आतापासूनच जनजागरण करावे आणि विविध प्रकारचे सण-उत्सव, समारंभ, मिरवणुका आदी बाबींना जबाबदार असणाऱ्या सर्व संबंधितांना तत्काळ कायदेशीर प्रतिबंधात्मक नोटीसा बजवाव्यात. कोणाकडूनही, कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा प्रकारचे आदेश जिल्हाधिकारी यांनी मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर व मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांना द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

