
नाशिकरोड:( प्रतिनिधी )- आपल्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त करण्यात आलेल्या ग्रंथतुलेतील वाचनीय ग्रंथ आणि शैक्षणिक साहित्य ग्रामीण भागातील विद्यालयातील विद्यार्थ्यांना देत मविप्र संस्थेतील सेवानिवृत्त क्रीडासंचालक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा.जे.के.गुरुळे यांनी वाचन संस्कृतीला अनोखे बळ दिले.
पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात आयोजित विशेष ग्रंथप्रदान सोहळ्याला प्रा.जे.के.गुरुळे, नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे, मविप्रतील सेवानिवृत्त क्रीडा संचालक प्रा.बी.बी.शिंदे, अंजली पगार, मुख्याध्यापक अरुण पगार यांच्यासह शिक्षक-कर्मचारीवृंद उपस्थित होते.
प्रा.जे.के.गुरुळे यांनी सुमारे साठहून अधिक मौलिक ग्रंथ, आठ डझन वह्या गरजू विद्यार्थ्यांना प्रदान केल्या. प्रा.बी.बी.शिंदे आणि अंजली पगार यांनी आपल्या मनोगतात गुरुळे परिवाराच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. तर सुधाकर गोडसे यांनी वाचन संस्कृतीच्या विकासासाठी गुरुळे परिवाराने दिलेले ग्रंथयोगदान विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकणारे आहे, असे उदगार काढले. रवींद्र मालुंजकर यांनी निवेदन केले तर शिक्षक कैलास लहांगे यांनी आभार मानले.

