
जव्हार | प्रतिनिधी
संपूर्ण श्रावण महिन्यात श्रीराम पुरुष भजनी मंडळ, जव्हार यांच्या वतीने जव्हार शहरातील १३ मंदिरांमध्ये दररोज संध्याकाळी ७ ते ९ वाजता भजन सेवेचे आयोजन करण्यात आले होते. या सेवेचा उत्साहात समारोप झाला.
याबत माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेशजी वनमाळी यांनी सांगितले की, श्रावण महिन्यापूर्वी श्री. अनिल दवणे यांनी ही अखंडित भजन सेवा सुरू ठेवण्याची संकल्पना मांडली होती. त्यांच्या प्रेरणेने मंडळातील सर्व सदस्यांनी यथाशक्ती, तुटक-मुटक का होईना पण निष्ठेने ही सेवा सुरू ठेवली आणि गेल्या ४ वर्षांची ही परंपरा अखंडित ठेवली.

या महिन्याभराच्या सेवेत जव्हारमधील सर्व संत मंडळी आणि जव्हार वासीयांचे मोलाचे सहकार्य लाभले. काही ठिकाणी स्थानिक परिसरातील संत मंडळींनी स्वतःहून चहा-पानाची सेवा हाती घेतली. विशेष सहकार्य लाभले ते श्री. घनश्याम रावळ दादा यांचे, ज्यांच्यामुळे समारोपीय कार्यक्रमात महाप्रसाद / भोजन सेवेचे आयोजन करता आले.
जिथे जिथे कमी पडले तिथे श्रीराम भजनी मंडळाच्या सदस्यांनी खांद्याला खांदा लावून सहकार्य केले.
अध्यक्ष राजेशजी वनमाळी आणि श्रीराम भजनी मंडळ, जव्हार यांच्या वतीने या श्रावण मास भजन महोत्सवाला मोलाचे योगदान व सहकार्य देणाऱ्या सर्व भजनी मंडळातील सदस्यांचे, संत मंडळींचे व सर्व जव्हार वासीयांचे मनापासून आभार मानण्यात आले असून, अशीच अखंडित सेवा घडत राहो हीच प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना करण्यात आली आहे

