
सोनांबे ता. 10: पाटोळे (ता. सिन्नर ) जिल्हा परिषद शाळेची ज्ञानयात्री क्षेत्रभेट नुकतीच संपन्न झाली. यातून विद्यार्थ्यांना इतिहास, विज्ञान, अंतराळ आणि प्रशासकीय कार्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळावे, विविध विषयांचा जवळून परिचय व्हावा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘ज्ञानयात्री’ उपक्रमांतर्गत ही क्षेत्रभेट झाली.

या क्षेत्रभेटीत विद्यार्थ्यांनी भक्तीधाम , अण्णा गणपती, कुमारमंगलम आर्टिलरी म्युझियम देवळाली कॅम्प, यशवंतराव चव्हाण तारांगण, दादासाहेब फाळके स्मारक, पांडवलेणी तसेच नाशिक जिल्हा परिषद मुख्यालय, सीटी सेंटर मॉल या महत्त्वपूर्ण ठिकाणांना भेट देऊन विविध विषयांचे अनुभवाधारित ज्ञान घेतले. कुमारमंगलम आर्टिलरी सेंटर येथे विद्यार्थ्यांना कारगिल युद्धाची चित्रफित दाखविण्यात आली. तसेच पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, भारत – पाकिस्तान युद्ध, भारत-चीन युद्ध आणि विविध सैनिकी कारवायांमध्ये वापरण्यात आलेल्या साहित्य प्रतिकृतींची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली

. युद्धामध्ये वापरलेल्या विविध वस्तू व साहित्य प्रत्यक्ष पाहण्याबरोबरच काही वस्तू हाताळण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची भावना आणि भारतीय सैन्याबद्दल आदर अधिक दृढ झाला. यशवंतराव चव्हाण तारांगणात विद्यार्थ्यांनी आकाशातील ग्रह-तारे, अंतराळातील घडामोडी आणि भौगोलिक प्रक्रियांचा दृकश्राव्य माध्यमातून जवळून अभ्यास केला. वर्गातील पाठ्यपुस्तकातील संकल्पना प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व अवकाश संशोधनाबद्दल कुतूहल निर्माण झाले. पांडवलेणीच्या क्षेत्रभेटीत विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक लेणी, त्यांची रचना, स्थापत्यकला आणि इतिहासातील त्यांचे महत्त्व यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. ‘ऐतिहासिक साधने’ या घटकाचा अभ्यास करताना प्रत्यक्ष स्थळाला भेट देण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी विशेष ज्ञानवर्धक ठरला. नाशिक जिल्हा परिषद मुख्यालयाला भेट दिल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रशासनाची कार्यपद्धती, जिल्हा परिषदेचे विविध विभाग आणि शिक्षण क्षेत्रातील कामकाज याबाबत माहिती घेतली. ज्ञानयात्री क्षेत्रभेटीसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, नाशिक यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी वाहन उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित व आनंददायी प्रवासासह विविध ज्ञानकेंद्रांना भेट देण्याची संधी मिळाली.
पाटोळे शाळेच्या ‘ज्ञानयात्री’ उपक्रमासाठी ग्रामपंचायत पाटोळे तसेच पांडुरंग रामनाथ सांगळे यांनी विद्यार्थ्यांच्या खाऊसाठी आर्थिक मदत केली. त्यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांच्या क्षेत्रभेटीचा आनंद अधिक द्विगुणित झाला. प्रत्येक शाळेतील सहावी व सातवीच्या ३० विद्यार्थ्यांनी या क्षेत्रभेटीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. मुख्याध्यापक वसंत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल जोरी व स्वाती खताळे यांनी क्षेत्रभेटीचे नियोजन व संयोजन केले.या उपक्रमासाठी नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, गटशिक्षणाधिकारी राजेश डामसे, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. विजय बागुल, कैलास सांगळे, सुनीता अहिरे तसेच सर्व केंद्र समन्वयक यांनी मार्गदर्शन केले.

वर्गातील चार भिंतींपलीकडे जाऊन इतिहास, विज्ञान, अंतराळ, संरक्षण व्यवस्था आणि प्रशासकीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा ‘ज्ञानयात्री’ उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ सहल न ठरता ‘अनुभवातून शिक्षण’ देणारी अविस्मरणीय ज्ञानयात्रा ठरली.

