
नांदगाव : ( प्रतिनिधी ) मविप्र समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथे ‘अविष्कार’ संशोधन स्पर्धेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी संशोधन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘अविष्कार’ संशोधन स्पर्धेत सक्रिय सहभाग घेऊन नावीन्यपूर्ण, चिकित्सक, वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित आणि समाजोपयोगी संशोधन प्रकल्प सादर करावेत, असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. यू. पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले.
विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करणे, चिकित्सक विचारसरणी विकसित करणे तसेच नावीन्यपूर्ण व समाजोपयोगी संशोधनाला प्रोत्साहन देणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश असल्याचे ARC समन्वयक डॉ. एम. पी. मेश्राम यांनी प्रास्ताविकातून सांगितले.

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. किरणकुमार खंदारे यांनी विद्यार्थ्यांना संशोधन प्रक्रियेचे महत्त्व समजावून सांगितले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या मनातील जिज्ञासा हीच संशोधनाची पहिली पायरी आहे. एखाद्या समस्येकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहणे, प्रश्न उपस्थित करणे आणि त्या प्रश्नाचे शास्त्रीय पद्धतीने उत्तर शोधणे म्हणजे संशोधन होय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचे निरीक्षण करून त्यातून संशोधनाच्या संधी शोधल्या पाहिजेत.”
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. एस. ए. मराठे, पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. सी. बी. निगळे, IQAC समन्वयक प्रा. एम. बी. आटोळे, डॉ. आर. डी. झनकर तसेच प्रा. बी. पी. मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. व्ही. ए. गागरेपाटील यांनी केले, तर प्रा. अंकुश लवाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी अविष्कार संशोधन समितीचे प्रा. डी. वाय. तुंगार, प्रा. भिमराज गायकवाड, श्रीमती एस. एम. अवारे, प्रा. एस. जे. कर्वे आणि प्रा. बी. पी. गोरे ,प्रा.योगेश वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले.

