
नाशिक:- ( प्रतिनिधी ) आजच्या स्पर्धेच्या काळात महिलांसाठी अशी अनोखी वक्तृत्व स्पर्धा आवश्यक आहे. प्रत्येक महिलेच्या स्वकार्यक्षमतेवरील विश्वास व्यक्त होणं हे गरजेचं आहे. प्रत्येक स्त्री आत्मविश्वासपूर्वक स्वतःकडे जेव्हा लक्ष देईल; तेव्हाच खऱ्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण होईल, असे प्रतिपादन मालेगावच्या महाराजा सयाजीराव गायकवाड स्वायत्त महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मृणाल भारद्वाज यांनी केले.
महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंचच्या वतीने स्व.विमलताई टिपरे स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण त्र्यंबक रस्त्यावरील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक वाचनालयात झाले, त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री जयश्री वाघ, प्रमुख पाहुणे प्रा.सुनील हिंगणे, रोटरी हेल्थ सोसायटीच्या माजी अध्यक्षा डॉ.शर्मिला मेहता, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार, कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर, गिरजा महिला मंचच्या उपाध्यक्षा भाग्यश्री चौधरी, ज्येष्ठ साहित्यिक सुहास टिपरे मंचावर उपस्थित होते.
सुमारे ६० महिला स्पर्धकांच्या सहभागाने यशस्वी झालेल्या स्व.विमलताई टिपरे स्मृती वक्तृत्व स्पर्धेतील गायत्री पेलमहाले (प्रथम), रसिका हांडोरे (द्वितीय), संजीवनी मोरे (तृतीय), सिद्धी गवळी (चतुर्थ) या विजेत्या स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. परीक्षण ज्येष्ठ साहित्यिका अलका दराडे यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक सुहास टिपरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
स्पर्धेचे उदघाटन शाक सावानाचे सचिव हेमंत पोतदार, ॲड.विद्या देवरे, पूजा दंडगव्हाळ, भारती निकम, सविता दरेकर, वंदना गांगुर्डे, वैशाली शिंदे, पूनम वाघमोडे, पुष्पा जाधव, विजया हिरे, चंद्रकला कोल्हे, प्रियंका ससे, सुनंदा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाध्यक्षा शीतल कुयटे यांनी पारितोषिके जाहीर केली. संगीता महाजन यांनी प्रास्ताविक केले. ज्योती हडस यांनी आभार मानले. सविता वैद्य यांनी सूत्रसंचालन केले.

