
कवी पी.जी. चौधरी सर यांच्या ‘चाहूल’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न
एरंडोल 🙁 प्रतिनिधी ) कविताच जर जन्माला आली नसती तर सृष्टी,दृष्टी आणि मानवी जगणं भकास झालं असतं. कवितेनं माणसाला माणूस केलं.जगण्याला मोल दिलं.निकोप समाज व्यवस्था उभी राहत गेली ती कविता या साहित्य प्रकारामुळे. कारण मानवी मनाजवळ सहजी जाणारा हा वाङ्मय प्रकाराने समाजाला ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी मिळाली तुकोबांच्या गाथेतील अभंग घराघरात पोहचले, पराक्रमाची व देशभक्तीची कवने असो वा मानवता धर्माची शिकवणूक असो या संपूर्ण संस्कारांची पेरणी झाली ती कवितेमुळे.म्हणून मला हा साहित्य प्रकार सर्व साहित्य प्रकारांपेक्षा मनस्वी भावतो.असे काव्यमहात्म्य आज दि.१३.०९.२०२६ रोजी कमलनाम साहित्य मंच एरंडोल आयोजित कवी पी.जी. चौधरी यांच्या ‘चाहूल’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभावेळी उपस्थित रसिक श्रोत्यांपुढे व्यक्त केले. प्रा.आंधळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.यावेळी खान्देशाचे सुप्रसिद्ध नाट्यकर्मी ‘आयतं पोयतं सख्यानं’ या धमाल एकपात्री प्रयोगाचे सदरकर्ते मा. प्रवीण महाजन(शिरपूर) व नाशिक येथील मा. विजय भागवत महाजन यांचे शुभहस्ते चाहूल काव्यसंग्रहाचे दमदार प्रकाशन करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर चाहूल काव्यसंग्रहाचे कवी पी.जी. चौधरी सर माजी जि.प.सदस्य मा. नानाभाऊ महाजन, डायटचे प्राचार्य राजेंद्र महाजन,कवी निंबा पुना बडगुजर,प्रकाश श्रीराम माळी(तळोदा),रावसाहेब अरुणकुमार माळी,मा.नथ्थू काशिनाथ पिंपरे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली. यावेळी कवी पी.जी. चौधरी सरांनी आपल्या मनोगतातून सृजन प्रेरणा विशद करीत काव्यलेखन प्रवासावर विस्ताराने भाष्य केले.सर्व प्रमुख अतिथींनी मनोगतातून कवी चौधरी यांच्या काव्यलेखन सौंदर्यावर आपली मतं मांडलीत.कमलनाम साहित्य मंचचे संचालक युवा कवी प्रग्नेश झाम्बरे यांनी कवी पी.जी. चौधरी यांच्या व्यक्तित्वावर मनोगतातून म्हटलेली कविता विशेष आकर्षण ठरली. अतिथी गणांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी प्रा.आंधळे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की,कवी पी.जी. चौधरी यांनी भवतालातल्या सगळ्याच विषयांना आपल्या सृजनातून चांगला न्याय दिला असून त्यांच्या लेखनातील सहजता हे मला लेखनाचे सौंदर्य स्थळ वाटते असे विधान करीत त्यांच्या कवितांचे संदर्भ श्रोत्यांपुढे मांडलेत.
सदर समारंभास सूर्योदय जेष्ठ नागरिक संघ एरंडोलच्या सभासदांसह नगर वाचनालयाचे अध्यक्ष मा. जगदीश ठाकूर,माजी सैनिक रघुनाथ सुतार,माजी सैनिक ठाकूर,पीजी सरांचे माजी विदयार्थी तसेच जळगाव,धुळे,नाशिक,शिरपूर तळोदा,मुंबई,बदलापूर येथून तसेच एरंडोल शहरातील जेष्ठ रसिक श्रोत्यांची भरगच्च उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.हेमंत चौधरी यांनी केले.तर काव्यमयी बहारदार सूत्र संचालन आदर्श शिक्षिका सौ.क्षमा साळी यांनी केले.आभार प्रदर्शन कमलनाम मंचचे उपाध्यक्ष कवी निंबा पुना बडगुजर यांनी केले. या बहारदार प्रकाशन समारंभाच्या यशस्वीतेसाठी प्रा.हेमंत चौधरी,कमलेश चौधरी,विनायक कुलकर्णी,प्रेमराज महाजन,शाळीग्राम चौधरी, भीमराव महाजन संपादक माळी भूषण, प्रग्नेश झांबरे,सौ.कांचन कमलेश चौधरी मॅडम, सौ.कांचन विजय महाजन,निंबा पुना बडगुजर, सुरेश देशमुख यांनी परिश्रम घेतले.यावेळी कमलनाम साहित्य मंचचे संचालक मंडळाची आवर्जून उपस्थिती लाभली.

