
म. स. गा. महाविद्यालयात विश्वबंधुत्व अमृत पंधरवडा निमित्त व्याख्यान
मालेगाव (वार्ताहर) मानवजातीच्या उत्कर्षासाठी विश्वबंधुत्वाची, विश्वधर्माची शिकवण देत, भारतीय मानवधर्माची महती आपल्या जाज्वल्य विचारातून साता समुद्रापार अमेरिकेतील शिकागो सर्वधर्मपरिषदेत विवेकानंदांनी मांडली. त्यांचा संदेश म्हणजे या महान राष्ट्राने आपल्या ध्येयाप्रती टाकलेले पहिले पाऊल होते. त्यांचे विश्वबंधुत्वाचे विचार अक्षय प्रेरणास्रोत आहेत. असे प्रतिपादन नाशिक विवेकानंद केंद्राचे माजी नगरप्रमुख तथा उपक्रमशील प्रा. अमोल अहिरे यांनी केले. ते येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात विश्वबंधुत्व अमृत पंधरवडा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. अजय ठाकरे होते. प्रमुख अतिथी म्हणून अमृत संस्थेचे जिल्हा समन्वयक दीपक गुप्ता होते.

समवेत प्राचार्य डॉ. सुभाष निकम, पर्यवेक्षक प्रा. शशीकांत भदाणे, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. शासनाच्या अमृत ही स्वायत्त संस्था, विद्यार्थी कल्याण मंडळ व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वबंधुत्व पंधरवडा निमित्ताने विवेकानंदांच्या शिकागो भाषणाची लेखन स्पर्धा, पाठांतर स्पर्धा, जाहीर व्याख्यान आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात होते.
यावेळी बोलताना प्रा. अहिरे म्हणालेत, महापुरुषांचे जीवन केवळ कथनासाठी नसून ते अनुकरणासाठी असते, विवेकानंद ही केवळ एक व्यक्ती नसून ती वृत्ती आहे म्हणून तिची पुनरावृत्ती शक्य आहे.

मनुष्य निर्माणासाठी विवेकानंदांची वृत्ती अंगी बाणवली तर जीवन सफलतेकडून सार्थकतेकडे परावर्तित होऊन राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेला चालना मिळेल. विवेक विचारांतून स्वतःमध्ये परिवर्तन घडवून जीवनाचे निर्माल्य देशसेवेसाठी समर्पित व्हावे असा संकल्प करावा. असे आवाहन प्रसंगी प्रा. अहिरे यांनी केले. प्रास्ताविक दीपक गुप्ता यांनी केले, परिचय, सूत्रसंचलान व आभार प्रा. महेंद्र पवार यांनी मानलेत.

