
नाशिक 🙁 प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच सार्वजनिक वाचनालयांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते १९ ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या ५७व्या जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्रकाश होळकर यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी राजू देसले यांचीही निवड करण्यात आली आहे.
संमेलनाचे उद्घाटन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त राजू बातिसकर यांच्या हस्ते होणार आहे. नाशिकच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि वैचारिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे हे तीन दिवसीय साहित्य संमेलन शनिवार, १७ ऑक्टोबर, रविवार, १८ ऑक्टोबर आणि सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी प.सा. नाट्यमंदिरात होणार आहे.
या संमेलनाची माहिती सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, कार्याध्यक्ष संजय कुंजकर, प्रमुख सचिव गिरीश नातू आणि सांस्कृतिक सचिव जयप्रकाश जाजेगावकर यांनी दिली. संमेलनात साहित्य, कविता, कथा, समीक्षा, सामाजिक व सांस्कृतिक विषयांवरील परिसंवाद, कवी संमेलन तसेच साहित्यिकांशी संवाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अनुवादित साहित्यावरही विशेष परिसंवाद आयोजित करण्यात येणार असून, ज्येष्ठ लेखिका वंदना अत्रे, प्रा. सतीश श्रीवास्तव आणि संजय चौधरी सहभागी होणार आहेत. परिसंवादाचे समन्वयक म्हणून अर्पणा वेलेणकर काम पाहणार आहेत.
लेखकांचे मनोगत या कार्यक्रमात ऐश्वर्य पाटेकर, जगदीश देवरे आणि रेखा भंडारे आपले विचार व्यक्त करणार आहेत. याचवेळी विविध पुरस्कारांचे वितरणही करण्यात येणार आहे.
नाशिकच्या समृद्ध साहित्यिक परंपरेला पुढे नेणाऱ्या या जिल्हा साहित्य संमेलनासाठी साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

