
विजयनगर मध्ये सौ.शोभा झळके यांच्या घरातील गौरीची आरास
सिन्नर :(प्रतिनिधी ) गणेशोत्सवाच्या आनंदात आज सिन्नर शहरात घरोघरी गौरींचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने आगमन झाले. गौरींच्या स्वागतासाठी सकाळपासूनच महिलांची लगबग सुरू होती. पारंपरिक पद्धतीने गौरींचे स्वागत, औक्षण व पूजन करण्यात आल्याने शहरातील विविध भागांत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.गौरी आगमनाच्या पार्श्वभूमीवर अनेक घरांमध्ये आकर्षक सजावट, फुलांची आरास, रांगोळ्या, तोरणे तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती. महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून गौरींचे विधिवत पूजन केले. गौरींच्या आगमनावेळी आरती, मंगलगाणी आणि भक्तिगीतांमुळे वातावरण प्रसन्न व भक्तिमय झाले.गौरींच्या दर्शनासाठी नातेवाईक, आप्तेष्ट आणि मित्रपरिवाराची वर्दळ सुरू झाली आहे. विविध घरांमध्ये पारंपरिक पद्धतीने नैवेद्य तयार करण्यात आला असून, गौरीपूजनासाठी आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेतही नागरिकांची गर्दी दिसून आली.सिन्नर शहरातील विविध भागांमध्ये गौरींचे उत्साहात स्वागत करण्यात आले. महिला वर्गामध्ये विशेष उत्साहाचे वातावरण असून, गौरीपूजनाच्या निमित्ताने घराघरांत श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे. गौरींच्या आगमनाने गणेशोत्सवाच्या उत्साहाला आणखी उधाण आले आहे.

