
नाशिक, ( प्रतिनिधी ): दि. १५ सप्टेंबर रोजी जगभर साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यशवाणी वेब रेडिओवर ‘आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन परिचय’ या विषयावर ज्ञानसत्राचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाच्या महाकवी वामनदादा कर्डक अध्यासनातर्फे आयोजित हे २४ वे ज्ञानसत्र दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी संपन्न झाले. परिसंवादातील तज्ज्ञांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना आंतरराष्ट्रीय लोकशाही मूल्यांचा महत्त्वपूर्ण पाया असल्याचे प्रतिपादन केले. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या संकल्पनेतून आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या कल्पक मार्गदर्शक सूचनेनुसार या ज्ञानसत्राचे आयोजन करण्यात आले. महाकवी वामनदादा कर्डक अध्यासनाचे प्रमुख प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी ज्ञानसत्राचे समन्वयन, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.
परिसंवादात लोकशाहीची जागतिक संकल्पना, दक्षिण आशियातील लोकशाहीची वाटचाल, विविधता, नागरिकांचा सहभाग, विरोधी पक्षांची भूमिका तसेच लोकशाहीसमोरील समकालीन आव्हाने यांवर चर्चा करण्यात आली. लोकशाही ही केवळ निवडणूक प्रक्रिया नसून समानता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, संवाद, सहअस्तित्व आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागावर आधारित व्यापक व्यवस्था असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. प्रथम परिसंवादक डॉ. राजेंद्र बगाटे यांनी ‘लोकशाहीची दक्षिण आशियाई जडणघडण : सार्क देशांची वाटचाल, विविधता आणि आव्हाने तसेच विरोधी पक्षांची भूमिका’ या विषयावर विचार मांडले. दक्षिण आशियातील विविध देशांतील लोकशाही संस्थांची वाटचाल, सामाजिक-सांस्कृतिक विविधता, नागरिकांचा सहभाग आणि विरोधी पक्षांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. द्वितीय परिसंवादक प्रा. सुजाता मोरे यांनी ‘भारतीय लोकशाही आणि नागरिकांची उदासीनता’ या विषयावर सविस्तर विवेचन केले. लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग, सार्वजनिक प्रश्नांविषयीची जागरूकता आणि नागरिकांच्या जबाबदाऱ्यांचे महत्त्व त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. पर्यटनशास्त्रीय दृष्टिकोनातून सामाजिक सहभागाच्या विविध पैलूंवरही त्यांनी प्रकाश टाकला. तिसरे परिसंवादक प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी ‘अमेरिकन व भारतीय लोकशाहीचा तुलनात्मक आढावा’ घेताना दोन्ही देशांच्या लोकशाही व्यवस्थांची वैशिष्ट्ये आणि संस्थात्मक रचनेचे विवेचन केले. यानंतर त्यांनी ‘पालक लोकशाहीचे’ हे समयोचित काव्य सादर केले.
या ज्ञानसत्राचा लाभ अध्ययनार्थी, शिक्षक, संशोधक आणि नागरिकांना घेता यावा, यासाठी कार्यक्रम विद्यापीठाच्या https://avc.ycmou.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यापीठाच्या दृक्श्राव्य केंद्राचे प्रमुख श्री. धनंजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रसहाय्यक श्री. प्रकाश सापनर व श्री. गिरीश गवळी यांनी तांत्रिक सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. दीपक राजगिरे यांनी विशेष परिश्रम घेतले. या ज्ञानसत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यासनप्रमुख प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी केले आहे.

